पुणे - टीम इंडियाने पुणे वनडेमध्ये विजय मिळवून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. भारत-न्यूझीलंड दरम्यानचा हा 100 वा सामना होता. या सामन्यात भारताने 6 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि न्यूझीलंडविरूद्ध 50 व्या विजयाची नोंद केली. शानदार गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानावर नेहमीच कर्णधार विराट कोहलीला मार्गदर्शन करत असतो हे तर आपल्याला सर्वांनाच माहितीये. मग तो एखादा मोठा निर्णय घ्यायचा असो किंवा फिल्डिंग सेट करणं असो. कोहलीला धोनीची साथ नेहमीच मिळते. बुधवारच्या सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं. स्टंपच्या मागून धोनी कोहली आणि संघाला सल्ला देत होता. धोनी, केदार जाधव आणि इतर गोलंदाजांना कुठे आणि कसा चेंडू टाकावा हे सांगत होता. फलंदाजांची कमकुवत बाजू तो गोलंदाजांना सांगत होता.
स्टंपच्या मागे काय बोलला धोनी -
केदार जाधवच्या गोलंदाजी दरम्यान धोनी सातत्याने त्याला प्रोत्साहन देताना, ''बहुत बढ़िया, अच्छा डाल रहा है''. ''ऐसा ही डाल इसको, हर तीसरा बॉल ये ही रखना'' असं म्हणत होता. तर फिल्डिंग सेट करण्यासाठी त्याने कोहलीला आपल्या स्टाइलमध्ये आवाज दिला. '' चीकू, दो-तीन जन (फील्डरों) को इधर छोड़ दे''.
कोहलीचं चीकू हे नाव सगळ्यांना समजण्यामागे धोनीचाच मोठा हात आहे असं कोहली एका इंटरव्यूमध्ये म्हणाला होता. कारण तो सातत्याने स्टंपच्या मागून मला चीकू-चीकू बोलत असतो, त्याच्यामुळेच हे नाव सर्वश्रूत झालं असं कोहली म्हणाला होता.