ICC Women World Cup: क्रिकेट खेळादरम्यान कधीकधी विचित्र घटना घडतात. या घटनांमुळे क्रिकेटचा थरार अधिकच वाढतो. ICC महिला विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान एक भन्नाट किस्सा घडला. या सामन्यात न्यूझीलंडच्या विकेटकीपरच्या चक्क ग्लोव्ह्जला चेंडू चिकटला अन् त्यामुळे फलंदाज बाद होण्यापासून वाचली.
बांगलादेशच्या डावाच्या २६व्या षटकात ही घटना घडली. लता मोंडलने चेंडू खेळून तीन धावा काढण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्रायकर फलंदाज जहानआरा आलम तिसरी धाव घेण्यास धावत असताना जवळपास धावबादच झाली असती. मात्र तिचं नशीब बलवत्तर त्यामुळे ती बचावली. न्यूझीलंडची यष्टिरक्षक केटी मार्टिनकडे चेंडू आला पण नवल म्हणजे तो चेंडू केटी मार्टिनच्या ग्लोव्ह्जमध्येच चिकटून राहिला. आणि तिला चेंडू स्टंपला मारता आला नाही.
चेंडू अशाप्रकारे अडकला की हात झटकून सुद्धा चिकटलेला चेंडू ग्लोव्ह्जमधून निघत नव्हता. नंतर अखेर मार्टिनने कसाबसा चेंडू वेगळा केला. या धमाल घटनेचा व्हिडिओ ICCने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचं तर न्यूझीलंडने बांगलादेशचा नऊ विकेट्सने पराभव करत पहिला विजय नोंदवला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने फर्गाना हक (५२) हिच्या अर्धशतकाच्या जोरावर २७ षटकांत ८ बाद १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात सुझी बेट्सचे अर्धशतक (नाबाद ७९) आणि एमेलिया केर (नाबाद ४७) सोबतच्या १०८ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडने ४२ चेंडू शिल्लक असताना १ बाद १४४ धावा केल्या. या खेळीदरम्यान, बेट्स महिला विश्वचषक स्पर्धेत हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारी सहावी फलंदाज ठरली.