U19 T20 World Cup, Funny Video: नुकत्याच झालेल्या पुरुषांच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आयर्लंडच्या संघाने इंग्लंडला धूळ चारली, तर झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले. महिलांच्या १९ वर्षांखालील टी२० वर्ल्ड कपमध्येही आज असाच एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. रवांडा महिला संघाने चक्क एकेकाळच्या वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला. अतिशय कमी धावसंख्येचा पाठलाग करताना रवांडाने सामना जिंकला. वेस्ट इंडिजला त्यांनी केवळ ७० धावांवर रोखले. त्यामुळे ६ गड्यांच्या मोबदल्यात १८.२ षटकांत रवांडाने सामना जिंकला. या सामन्यात एक अतिशय विचित्र प्रकारची घटना घडली. या अजब गजब विकेटचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.
वेस्ट इंडिजने ७० धावा केल्या. त्यांच्यातील केवळ सलामीवीर रिलीयाना ग्रिमंड हिलाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. बाकीचे सर्व फलंदाज एक आकडी धावसंख्येवर माघारी परतले. त्यातही ग्रिमंडची विकेट ही फारच चर्चेत आली. एखाद्या फलंदाजांला इतक्या विचित्र पद्धतीने बाद होताना क्रिकेटप्रेमींना क्वचितच पाहायला मिळाले असेल. विंडिजच्या संघाची अवस्था ३ बाद ३४ होती. ग्रिमंड १८ धावांवर खेळत होती. रवांडाकडून उसाबिमाना हिने फिरकी गोलंदाजी केली. चेंडू मारण्यासाठी ग्रिमंड पुढे आली पण तिला स्पिनचा अंदाज न आल्याने तिचा प्लॅन फसला. स्टंपिंग वाचवण्यासाठी ती मागे फिरली. ती इतक्या जोरात मागे फिरली की बॅट हातून सुटून थेट स्टंपजवळ गेली. पण तोपर्यंत तिला किपरने बाद केले होते. ग्रिमंडने मैदानातच लोटांगण घातलं पण त्याचा तिला काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर तिला माघारी परतावे लागले.
सामन्यात काय घडलं?
प्रथम फलंदाजी करायला आलेल्या वेस्ट इंडिजची फलंदाजी पूर्णपणे फसली. सलामीवीर जेम्स ७ धावांवर बाद झाल्यानंतर झटपट विकेट्स पडू लागल्या. कमरबॅच (०), जेबाना जोसेफ (७), अश्मिनी मुनीसर (८), ट्रिशान होल्डर (१), ग्लासगो (९) आणि लिना स्कॉट (०) ही वरची फळी स्वस्तात बाद झाली. तळाच्या फलंदाजांकडूनही फारशी मेहनत घेतलेली दिसली नाही. त्यामुळे त्यांचा डाव ७० धावांवर आटोपला. गोलंदाजीतही त्यांनी फार चांगली कामगिरी केली नाही. रवांडाच्या सलामीवीर उवासे (१०) आणि तुयीझेरे (१२) यांना लवकर बाद करण्यात विंडीज यशस्वी झाले. इशिमवेदेखील शून्यावर बाद झाली. पुढे येणारे जिवानीस उवासे (०), बेलिस मुरेकाटेटे (०), तुमुकुंडे (३) यांनीही केवळ हजेरी लावली आणि ते बाद झाले. त्यामुळे विंडीज सामना जिंकेल असेही वाटत होते. पण जिसेल इशिमवे हिने नाबाद ३१ धावांची खेळी केली व संघाला विजय मिळवून दिला.