Join us  

Virat Kohli Rohit Sharma Funny Video: फुल टू धमाल! 'त्या' वाक्यानंतर विराट अन् रोहित दोघेही हसून लोटपोट, नक्की काय झालं पाहा

रोहितने सामन्यानंतर घेतली विराटची खास मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 4:24 PM

Open in App

Virat Kohli Rohit Sharma Funny Video: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकले. तब्बल १ हजार २१ दिवसांच्या अंतरानंतर विराटने शतक झळकावले. विराटने ६१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची कुटल्या. त्यामुळेच भारताने अफगाणिस्तानला २१३ धावांचे आव्हान दिले. अफगाणिस्तानला या आव्हानाचा पाठलाग करणं झेपलं नाही. भुवनेश्वर कुमारने ४ धावांत ५ बळी टिपत अफगाणिस्तानला २० षटकात १११ धावांवर रोखले. शतकी खेळी करणाऱ्या विराटला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या सन्मानानंतर, कर्णधार रोहित शर्माने विराटची खास मुलाखत घेतली. त्यावेळी एक मजेशीर किस्सा घडला.

विराट कोहलीच्या शतकाची प्रतिक्षा भारतीय चाहते गेली अडीच-तीन वर्षांपासून करत होते. अखेर विराटने गुरूवारी तो दुष्काळ संपवून टाकला आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे शतक साजरे केले. या शतकाबद्दल बोलताना, रोहित म्हणाला, "भारतीय चाहत्यांना ज्या शतकाची आतुरता होती ते शतक आज विराटने ठोकलं. पण महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांपेक्षाही विराट स्वत: या शतकाची आतुरतेने वाट पाहत होता. त्यामुळे याबद्दल विराटच्या भावना काय, ते जाणून घेऊ." रोहितच्या या प्रश्नानंतर विराटला हसू फुटलं. त्याचं कारण असं की, रोहितने शुद्ध हिंदी भाषेत मुलाखतीची सुरूवात केली. ते पाहून विराट म्हणाला की, बापरे! इतकं शुद्ध हिंदी रोहित माझ्याशी या आधी कधीच बोललेला नाही. या वाक्यावर रोहित आणि विराट दोघेही हसून लोटपोट झाले.

पाहा या धमाल-मस्तीचा Video-

दरम्यान, अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने विश्रांती घेतल्यामुळे लोकेश राहुल-विराट कोहली जोडी सलामीला आली आणि त्यांनी शतकी सलामी ठोकली. राहुल ४२ चेंडूत ६१ धावांवर बाद झाला. पण विराटने नाबाद १२२ धावा कुटल्या. २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, 'स्विंगचा किंग' भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. भुवीने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ४ धावा दिल्या आणि ५ महत्त्वाचे फलंदाज गळाला लावले. इतर गोलंदाजांनीही त्याला झकास साथ दिली. अर्शदीपने मोहम्मद नबीला (७), आर अश्विनने मुजीब उर रहमानला (१८) तर दीपक हुडाने राशिद खानला (१५) तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीरोहित शर्माभुवनेश्वर कुमार
Open in App