इस्लामाबाद : पीसीबीचे भावी अध्यक्ष म्हणून ज्यांचे नाव चर्चेत आहे ते झका अश्रफ यांनी पाकिस्तान व श्रीलंकेत सप्टेंबरमध्ये आयोजित आशिया चषकाचा हायब्रिड मॉडेल धुडकावून लावला. नजम सेठी यांनी हा मॉडेल पुढे केला होता.
इस्लामाबाद येथे बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना अश्रफ म्हणाले, ‘मी याधीही हायब्रिड मॉडेल मान्य केला नव्हता. ही स्पर्धा पाकिस्तानात होईल, असा आशियाई क्रिकेट परिषदेने निर्णय घेतला होता. त्यानुसार स्पर्धा आमच्याच देशात व्हावी.’ यामुळे ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागावर अनिश्चितेचे सावट पसरले. पाकिस्तान माघार घेणार असेल तर बीसीसीआयही कठोर धोरण अवलंबेल.
एसीसीच्या कार्यकारी बोर्डाने हायब्रिड मॉडेलला मंजुरी दिली. अश्रफ यांचे मतपरिवर्तन न झाल्यास आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानविना होईल. एसीसी बोर्डाने स्वीकारलेल्या मॉडेलमध्ये काहीही बदल होणार नाही. अश्रफ हे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मर्जीतील असल्याने पीसीबीचे ते नवे अध्यक्ष असतील. पंतप्रधान बोर्डाचे संरक्षक असतात, त्यामुळे नियुक्ती त्यांच्या मर्जीनुसार केली जाते. सेठी पदावरून दूर होताच २४ तासांत परिस्थिती बदलली. आसिफ झरदारी व शाहबाज शरीफ यांच्यातील मतभेदाचे कारण बनू इच्छित नसल्याने त्यांनी पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला.