Join us  

स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाचा जी. के. फणसे ४० षटकांच्या लीग स्पर्धेत पहिला विजय

धुरु क्रिकेट आणि स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा ६१ धावांनी केला पराभव

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 10, 2023 3:22 PM

Open in App

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अथर्व अधिकारी, ऋषिकेश शिर्के, लय धरमसीची अर्धशतकी खेळी, तन्मय जगतापच्या पाच विकेट्सच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने धुरु क्रिकेट आणि स्पोर्ट्स असोसिएशनचा ६१ धावांनी दणदणीत पराभव करत जी. के. फणसे स्पोर्ट्स-कल्चरल फाऊंडेशन आणि ठाणे फ्रेंड्स युनियन आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या जी.के.फणसे ४० षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.

आज सेंट्रल मैदानात हा सामना रंगला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अथर्व अधिकारी (६४) आणि ऋषिकेश शिर्केने (६९) ९५ धावांची दमदार भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर लय धरमसीचा (५५) अपवाद वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावा न करता आल्यामुळे स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाला ३६.३ षटकात २३० धावांवर समाधान मानावे लागले. अर्जुन बागायतकरने चार आणि सोहम बालशेतवार, क्रिश पारीखने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना धुरु क्रिकेट आणि स्पोर्टस असोसिएशनच्या अर्जुन बागायतकर आणि सोहम शिंदेने चांगली फलंदाजी केली खरी पण त्यांच्या इतर फलदाजांचा तन्मय जगतापच्या प्रभावी माऱ्यासमोर निभाव लागला नाही. फलंदाजितही छाप पाडताना अर्जुनने ४८ आणि सोहमने ४१ धावांचे योगदान दिले. तन्मयने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडताना अवघ्या आठ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स मिळवल्या. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे धुरु क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनचा डाव ३५.६ षटकात १६९ धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक: स्पोर्टिंग क्लब कमिटी : ३६.३ षटकात सर्वबाद २३० ( अथर्व अधिकारी ६४, ऋषिकेश शिर्के ६९, लय धरमसी ५५,अर्जुन बागायतकर ६.३- १- १९-४, सोहम बालशेतवार ६-१३-३, क्रिश पारीख ८-३८-३) विजयी विरुद्ध धुरु क्रिकेट-स्पोर्टस असोसिएशन : ३३.५ षटकात सर्वबाद १६९ ( अर्जुन बागायतकर ४८, सोहम शिंदे ४१, तन्मय जगताप ६-१-८-५, लय धरमसी ७-३१-३). स्पोर्टिंग क्लब कमिटी ६१ धावांनी विजयी.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ठाणे
Open in App