Shikhar Dhawan Chris Gayle LLC 2024 Team: टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवन याने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता शिखर धवन LLC मध्ये दिसणार आहे. लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या आगामी हंगामासाठी लिलावात खेळाडूंवर आधीच बोली लावली गेली होती. संघही जाहीर झाले होते. पण विशेष बाब म्हणून धवनला स्पर्धेत सहभाग मिळणार आहे. टीम इंडियाचा गब्बर गुजरातच्या संघातून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलसोबत खेळताना दिसणार आहे. धवन-गेल जोडीला गुजरात संघाने करारबद्ध केले आहे. तसेच भारताचा स्टार यष्टीरक्षक दिनेश कार्तिकही या लीगमध्ये सदर्न सुपरस्टार्स संघाचे नेतृत्व करणार आहे.
LLC मध्ये कोणत्या संघांचा समावेश
यावेळी कोणार्क सूर्या ओडिशा, गुजरात जायंट्स, मणिपाल टायगर्स, सदर्न सुपरस्टार्स, अर्बनरायझर्स हैदराबाद आणि इंडिया कॅपिटल्स या फ्रँचायझी लीजेंड्स लीगमध्ये सहभागी होतील. ख्रिस गेलला राईट टू मॅच (RTM) कार्डद्वारे खरेदी करण्यात आले. गुजरात संघात लेंडल सिमन्ससह शिखर धवन, मोहम्मद कैफ, एस श्रीशांतचा समावेश आहे.
इसुरु उदाना, प्रवीण गुप्ता यांच्यावर मोठी बोली
लिलावात श्रीलंकेचा इसुरु उदाना मालामाल झाला. त्याच्यावर सर्वाधिक बोली लागली. डावखुरा वेगवान गोलंदाज इसुरु उदानाला अर्बनरायझर्स हैदराबादने ६२ लाख रुपयांना विकत घेतले. भारतीय फिरकी गोलंदाज प्रवीण गुप्तावरही मोठी बोली लावण्यात आली. ५ लाखांच्या मूळ किमतीपासून मणिपाल संघाने अखेर त्याला ४८ लाख रुपयांना खरेदी केले.
२० सप्टेंबरपासून स्पर्धा
२० सप्टेंबरपासून लिजेंड्स लीग सुरू होणार आहे. हा तिसरा हंगाम जोधपूरच्या बरकतुल्ला खान स्टेडियममध्ये सुरू होईल. यावेळी ६ संघांमध्ये एकूण २५ सामने होणार आहेत. यात २०० हून अधिक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. अंतिम सामना १६ ऑक्टोबरला श्रीनगरमध्ये होईल. ४० वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील लोक थेट सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.