भारतीय संघ सध्या पराभवाच्या गर्तेत अडकल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताने वनडे मालिका ३-० अशी गमावली. त्यानंतर आता पहिल्या कसोटी सामन्यातही भारताला मानहानीकारक पराबव सहन करावा लागला. भारताला आतापर्यंत चांगली सलामी मिळाली नसल्याचे दिसून आले आहे. पण दुसरीकडे भारतासाठी आनंदाची बातमी आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन हा फिट झाला असून त्याने खास 'शोले' स्टाईलमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्यानंतर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी तंदुरुस्तही झाला. पण स्थानिक स्पर्धेत खेळत असताना धवनला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे धवनला न्यूझीलंडच्या दौऱ्याला मुकावे लागले होते.
दुखापतीनंतर धवनवर उपचार करण्यात आले. त्याचबरोबर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेण्यात आले आणि त्याच्या पुनर्वसनाची प्रक्रीया सुरु करण्यात आली. आता धवन पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळेच आता धवनने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
धवनला गब्बर म्हणूनही ओळखले जाते. शोले या सिनेमामध्ये गब्बर नावाची एक भूमिका होती. आता तर धवनने शोलेमधील एका संवादाद्वारे आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. धवनने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली त्याने, 'कितने बॉलर थे?' असे म्हटले असून त्यानंतर गब्बर इज बॅक, असे म्हणत आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.