Join us

गब्बर इज बॅक! १६ षटकार, २०७ धावा… शिखर धवनने ठोकलं विक्रम शतक, संघाला जिंकवला सामना

Shikhar Dhawan Century Video: धवनने झंझावाती फलंदाजी करत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:43 IST

Open in App

Shikhar Dhawan Century Video: शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL ला अलविदा केले असले तरीही तो आपल्या बॅटने दमदार कामगिरी करत आहे. धवन सध्या बिग क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये नॉर्दर्न चार्जर्सचे नेतृत्व करत आहे. मंगळवारी त्याने आपल्या संघासाठी धमाकेदार खेळी केली. धवनने यूपी ब्रिज स्टार्स विरुद्ध झंझावाती शतक झळकावले. त्याने बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला. त्याने ६३ चेंडूत ११९ धावांची तडाखेबंद खेळी केली.

धवन-शिनवारी जोडीची द्विशतकी सलामी

शिखर धवनने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आपल्या खेळीत त्याने ५ षटकार आणि १४ चौकार लगावले. धवनने अफगाणिस्तानचा फलंदाज शेनवारी याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी तब्बल २०७ धावांची भागीदारी केली. शिखर धवन आणि शिनवारीच्या झंझावाती खेळीमुळे नॉर्दर्न चार्जर्स संघाने ५२ धावांनी मोठा विजय मिळवला. शिनवारीनेही गोलंदाजांचा समाचार घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या खेळाडूने आपल्या स्फोटक खेळीत ११ षटकार आणि ७ चौकार लगावले. त्याने ४६ चेंडूत नाबाद १११ धावा केल्या. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि नॉर्दर्न चार्जर्स संघाने २० षटकांत २ बाद २७१ धावांची मजल मारली.

शिखर धवनची धडाकेबाज शतक, पाहा व्हिडीओ-

धवनच्या संघाचा ५२ धावांनी विजय

२७१ धावांच्या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना विरोधी संघ केवळ २१९ धावाच करू शकला. हॅमिल्टन मसाकादजा (७२ धावा) आणि चिराग गांधी (६२ धावा) यांनी संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

धवन दमदार फॉर्मात

शिखर धवन बिग क्रिकेट लीगमध्ये दमदार फॉर्मात आहे. धवन या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. धवनने ४ सामन्यांत ३०१ धावा केल्या आहेत.

टॅग्स :शिखर धवन