साऊथम्पटन : शॅनन गॅब्रियल (४-६२) आणि कर्णधार जेसन होल्डर (६-४२) यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुस-या दिवशी गुरुवारी गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव चहापानापर्यंत २०४ धावात गुंडाळला . तळाचा डॉमनिक बेस (नाबाद ३१) आणि जेम्स अँडरसन (१०) यांनी अखेरच्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी केल्यामुळे इंग्लंडला दोनशेचा पल्ला ओलांडता आला. प्रत्युत्तरात खेळताना अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा विंडीजने बिनबाद ३२ धावा केल्या होत्या.
काल १७.४ षटकात १ बाद ३५ धावा करणा-या इंग्लंडने आपले नवोदित फलंदाज लवकर गमावले. गॅब्रियलने भेदक मारा सुरु ठेवत ज्यो डेन्ली आणि रोरी बर्न्स यांना बाद केले. बर्न्सने आजच कसोटी क्रिकेटमध्ये हजार धावा पूर्ण केल्या. लागोपाठ बसलेल्या धक्क्याने इंग्लंड बॅकफूटवर गेला. यानंतर जॅक क्रॉले आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. तथापि जेसन होल्डरने क्रॉले आणि पोप यांना पाठोपाठ बाद करून इंग्लंडला पुन्हा एकदा तडाखा दिला. ५ बाद ८७ अशा बिकट अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी कर्णधार स्टोक्स आणि अनुभवी बटलर यांनी खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या १०० धावा फळ्यावर लावल्या. इंग्ल्डच्या डावात स्टोक्स (४३), जोस बटलर (३५) व बेस (३१) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव): ६७.३ षटकात सर्वबाद २०४ धावा (रोरी बर्न्स ३०, ज्यो डेन्ली १८, क्राऊले १०,ओली पोप १२,बेन स्ट्रोक्स ४३,जोस बटलर ३५, डोम बेस नाबाद ३१, जेम्स अॅन्डरसन १० ) अवांतर १०, गोलंदाजी: केमार रोच १९/६/४१/०, शॅनन गॅब्रियल १५.३/३/६२/४, अल्जारी जोसेफ १३/४/५३/०, जेसन होल्डर २०/६/४२/६.
ब्रॉडला वगळल्यामुळे डॅरेन गॉ आश्चर्यचकित
साऊथम्पटन : वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला न खेळविल्यामुळे माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉला आश्चर्य वाटले आहे.
त्याच्या मते, अलीकडच्या काळात जिम्मी अँडरसनच्या अनुपस्थितीत नेहमी संघाच्या दिमतीला असणाºया ब्रॉडला संधी न देणे आश्चर्यचकित करणारा निर्णय आहे.
इंग्लंडने बुधवारपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या कसोटीत अँडरसन, मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर यांच्यासह प्रभारी कर्णधार बेन स्टोक्स व फिरकीपटू डॉम बेस यांची निवड केली. ब्रॉडला वगळण्याचा निर्णय घेतला.
कसोटी क्रिकेटमध्ये ४८५ बळी घेत इंग्लंडचा सार्वकालिक दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ब्रॉडला यापूर्वी ८ वर्षांपूर्वी मायदेशातील कसोटी सामन्यात बाहेर ठेवण्यात आले होते. त्यावेळी २०१२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला विश्रांती देण्यात आली होती.(वृत्तसंस्था)
स्काय स्पोर्ट््सच्या ‘द क्रिकेट डिबेट’मध्ये बोलताना गॉ म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटले. गेल्या काही वर्षांत अँडरसन दुखापतीमुळे संघाबाहेर असताना ब्रॉडने संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळलेली आहे. संघातील दोन्ही सिनिअर गोलंदाज अँडरसन व ब्रॉड यांना संधी द्यायला हवी होती. माझ्या मते, हे दोन्ही गोलंदाज सारखेच हकदार आहेत. त्यानंतर मी आर्चर व वुड यांना संधी दिली असती.’
Web Title: Gabriel, Holder's knock, England's first innings against the West Indies ends at 204
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.