कोलंबो : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आशिया कपच्या सुपर-४ लढतीला सामोरे जाण्याआधी अंतिम संघात लोकेश राहुल की ईशान किशन यांच्यापैकी कुणाला संधी द्यावी, यावरून भारतीय संघ व्यवस्थापन द्विधा मन:स्थितीत आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकविरुद्ध उतरणार असल्याने सर्वोत्कृष्ट ११ खेळाडू कोण असतील, याचा वेध घेतला जात आहे. राहुल की किशन यावर तोडगा काढावाच लागेल; पण पावसाचा व्यत्यय येऊ नये, यासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस असेल. राहुल संघात परतल्यामुळे कुणाला राखीव बाकावर बसवायचे, ही डोकेदुखी वाढली आहे.
भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व बुमराह करणार असून सिराज आणि शार्दूल ठाकूर यांच्याकडूनही प्रभावी गोलंदाजीची अपेक्षा बाळगता येईल. दोन्ही संघ मैदानावर उतरताच अंतिम ११ खेळाडू, फॉर्म, मागील विक्रम जिथल्या तिथे राहतात. त्यामुळे उभय संघांमध्ये काट्याची टक्कर होईल, यात शंका नाही.
सुपर-४ मध्ये विजयाची गरज
पाकविरुद्ध संतुलित संघ खेळविण्याचे रोहितपुढे आव्हान असेल, कारण सुपर-४ मध्ये विजयाचीच गरज आहे. पाकने लाहोरमध्ये बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत माघारला. पाकच्या भेदक माऱ्याचे आव्हान परतविणे भारतीय फलंदाजांसाठी आव्हान असेल. खेळपट्टी कशीही असली तरी प्रतिस्पर्धी गोलंदाज भेदक मारा करण्यास सक्षम आहेत. हारिस रौफने तीन सामन्यांत नऊ गडी बाद केले. आफ्रिदीने सात बळी घेतले. त्यामुळे गोलंदाजीत भारताच्या तुलनेत पाक संघ बलाढ्य वाटतो.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
पाकिस्तानचा अंतिम संघ : बाबर आझम(कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक,सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद,मोहम्मद रिझवान(यष्टिरक्षक), फहीम अश्रफ,नसीम शाह, शाहीनशाह आफ्रिदी आणि हारिस रौफ.
झारखंडचा २५ वर्षांचा डावखुरा फलंदाज किशनने गेल्या महिन्याभरात चार सामन्यांत चार अर्धशतके ठोकली. पाकविरुद्ध २ सप्टेंबर रोजी त्याने ८२ धावांची खेळी केली. सलामीवीर ते पाचव्या स्थानावरील फलंदाज म्हणून तो सहज खेळतो. ही उपलब्धी पाहता त्याला झुकते माप देण्यास हरकत नाही.
बंगळुरूचा ३१ वर्षांचा खेळाडू राहुल पाचव्या स्थानावर दावेदार आहे. तो जांघेच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रियेनंतर यंदा मार्चपासून एकही सामना खेळलेला नाही. २०१९ पासून तो वनडे संघाचा सर्वांत तगडा फलंदाज म्हणून पुढे आला. त्याने २०१९ ला ३१ सामन्यांत ५७२ तर २०२० ला नऊ सामन्यांत ४४३ आणि २०२१ ला तीन सामन्यांत १०८ धावा केल्या. २०२२ ला दहा सामन्यांत त्याच्या २५१ तर २०२३ ला सहा सामन्यांत २२६ धावा केल्या.
या आकडेवारीवर बारीक नजर टाकल्यास राहुलने १८ सामन्यांत ५३ च्या सरासरीने ७४२ धावा केल्या. त्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तो यष्टिरक्षणही करू शकतो. शुक्रवारी त्याने यष्टिरक्षणाचा सराव केल्यामुळे त्याच्या पुनरागमनाचे संकेत मिळाले.
सामना : दुपारी ३ वाजेपासून,
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स,
स्ट्रीमिंग : डिझ्नी हॉटस्टार
Web Title: 'Gadar-2' today in India-Pakistan asia cup; Decision on Rahul or Kishan too
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.