मुंबई : ‘टीआरपीसाठी या चर्चा चांगल्या आहेत. पण, मी माझे नाते सार्वजनिक करत नाही. विराट कोहलीसोबतच्या नात्याविषयी मी एकच सांगेन की, आम्ही दोघेही प्रगल्भ आहोत. मैदानावर प्रत्येकाला स्वत:च्या जर्सीसाठी लढण्याचा आणि ड्रेसिंग रूममध्ये विजयासह परतण्याचा अधिकार आहे. या क्षणी आम्ही १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत आहोत आणि मला खात्री आहे की, आम्ही एकाच उद्देशाने मैदानावर उतरणार आहोत. मैदानाबाहेर आमचे नाते चांगलेच आहे आणि ते कायम राहील,’ असे भारताचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले.
गंभीर व कोहली हे दोघे दिल्लीचे. दोघांमध्ये आयपीएलदरम्यान अनेकदा बाचाबाची झाली. आता टीम इंडियात गंभीरपर्व सुरू होत असताना विराटसोबतच्या त्यांच्या नात्यावर चर्चा होणे साहजिक आहे. ‘आम्ही फोनवर एकमेकांना सतत मेसेजेस पाठवीत असतो. विचारांची देवाणघेवाण करतो,’ असे गंभीर यांनी सांगितले.
तीन प्रकारांत वेगळे संघ...भविष्यात तीन प्रकारांसाठी तीन संघ दिसतील का, असे विचारले तेव्हा गंभीर म्हणाले, ‘पुढे जात असताना अशा गोष्टी होऊ शकतात. पण, आताच तीन वेगवेगळे संघ असतील, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. टी-२० क्रिकेटमध्ये स्थित्यंतर झाले. दिग्गज निवृत्त झाले. सर्व प्रकारांत खेळणारे जास्त खेळाडू असणे कधीही चांगले.’
बुमराहसाठी कार्यभार व्यवस्थापनगंभीर यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासाठी कार्यभार व्यवस्थापन गरजेचे असल्याचे सांगितले. केवळ बुमराहसाठीच नव्हे, तर सर्व वेगवान गोलंदाजांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनासारखा सपोर्ट स्टाफ गंभीर यांनी त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर आणि रायन टॅन डोएशे यांची सहायक प्रशिक्षक म्हणून निवड केली. याशिवाय साईराज बहुतुले अंतिम गोलंदाजी कोच तर टी. दिलीप हे क्षेत्ररक्षण कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर येत असल्याचे सांगितले.
रोहित, विराटने अधिकाधिक सामने खेळावेत!भारताचे लक्ष २०२७ च्या वनडे विश्वचषकावर लागले आहे. त्यादृष्टीने कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज खेळाडू विराट कोहली यांनी अधिकाधिक सामने खेळायला हवे, असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना वाटते. गंभीर म्हणाले, ‘मला कल्पना आहे की, हे दोन खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये काय करू शकतात. टी-२० विश्वचषक असो अथवा वनडे, दोघांचीही मोठी ताकद आहे. दोघांमध्ये बरेच क्रिकेट शिल्लक आहे. रोहित, विराट यांनी त्यांचा फिटनेस कायम राखला, तर दोघेही २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतात.’ असे गंभीर म्हणाले.