मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. आपल्या लाडक्या बापाला घरी आणण्यासाठी सर्व भक्तमंडळी रमली आहे. चहुबाजूला 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर सुरू आहे, मागील दोन वर्षे कोरोनामुळे या सणावर काही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र यंदा मोठ्या उत्साहात आणि वाजत-गाजत सर्वजण आपल्या बाप्पाचे स्वागत करत आहेत. गणपती बाप्पाच्या चरणी अवघं जग नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, क्रिकेट वर्तुळातील अनेक खेळाडूंनी गणेश महोत्सवात सहभागी होऊन आपल्या चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरं तर गणेशोत्सवाचा सण केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जगभर आपल्या बाप्पाचे आजच्या दिवशी आगमन होत असते. भारतीय क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू देखील बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने देखील आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना तसेच दिनेश कार्तिक आणि शुबमन गिल यांनी चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.