सूरत: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रोटोकॉल झुगारुन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांतीची परवानगी दिली. बुमराहला गुरुवारपासून केरळविरुद्ध गुजरातकडून रणजी सामना खेळून तंदुरुस्ती सिद्ध करण्याची संधी होती. मात्र बुमराहने गांगुली आणि सचिव जय शाह यांना स्वत:च्या समस्या सांगितल्या. यानंतर गांगुली आणि शाह यांनी बुमराहला सध्या मर्यादित षटकांच्या सामन्यांवर अधिक लक्ष देण्याची सूचना केली. पुरेशी विश्रांती घे, त्यानंतरच मैदानात ये, असेही सुचविले. गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल यानेही या वृत्तास दुजोरा दिला असून बुमराह सूरतमध्ये खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनीही बुमराहने रणजी सामन्यात खेळू नये अशी इच्छा व्यक्त केली. याचा अर्थ बुमराह आता थेट श्रीलंकेविरुद्ध ५ जानेवारीपासून टी२० मालिकेत खेळताना दिसेल.
तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या बुमराहला केरळविरुद्ध सामन्यासाठी सूरतमध्ये दाखल होण्यास सांगण्यात आले होते. मात्र आपण अद्याप तंदुरुस्त नसल्याचे बुमराहचे स्वत:चे मत आहे. यामुये स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन ही अतिघाई ठरेल, असे त्याचे मत आहे. जानेवारी २०२० पासून सुरू होत असलेल्या सत्रात पुनरागमन करण्याचे बुमराहचे लक्ष्य आहे. त्याने या संदर्भात गांगुली आणि शाह यांना माहिती दिली. सूत्रानुसार पाठदुखीतून सावरलेल्या बुमराहने रणजी सामना खेळला तरी त्याला दिवसभरात केवळ आठ षटके टाकण्याची परवानगी तज्ज्ञांनी दिली होती.
Web Title: Ganguly advises Bumrah to rest
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.