कोलकाता : खेळाडू आपल्या समस्या बहुतांशी स्वत:हून सोडवताना दिसतात. पण ज्या समस्या त्यांना सोडवता येत नाही त्यासाठी त्यांना प्रशासक किंवा एखाद्या राजकीय नेत्याकडे सल्ला मागावा लागतो. शरद पवार हे ज्येष्ठ राजकारणी आहेतच, पण त्याचबरोबर ते प्रशासकही होते. त्यावेळी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्यांच्याकडे सल्ला मागितला होता. गांगुलीने याबाबत 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्रामध्ये खुलासा केला आहे.
एक कर्णधार म्हणून गांगुलीची कारकिर्द साऱ्यांनाच माहिती आहे. त्याच्या कार्यकाळातच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांना भारताचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. प्रशिक्षकपद सांभाळल्यावर कालांतराने गांगुली आणि चॅपेल यांच्यामध्ये वाद-विवादाला सुरुवात झाली. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, या दोघांमधून विस्तवही जात नव्हता.
चॅपेल आणि गांगुली यांच्या वादाने एकदा टोक गाठले होते. त्याचा विपरीत परिणाम गांगुलीवर झाला. त्यावेळी गांगुली क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारापर्यंत आला होता. त्यावेळी गांगुलीने पहिल्यांदा आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी गांगुलीला काही सल्ले दिले. पण तरीही गांगुलीचे समाधान होत नव्हते. त्यावेळी एका समकालिन क्रिकेटपटूने गांगुलीला पवारांकडून सल्ला घेण्यास सांगितले आणि गांगुलीने पवारांपुढे आपली समस्या मांडली. पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनपासून बीसीसीआय आणि आयसीसचेही अध्यक्षपद भूषवले आहे.
पवार यांनी गांगुलीची समस्या शांतपणे ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी '' तू क्रिकेट सोडण्याचा विचारदेखील करू नकोस. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात. हे दिवसही सरतील आणि सारे काही आलबेल होईल,'' असा सल्ला गांगुलीला दिला. त्यामुळे गांगुलीने त्यावेळी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता.