नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग याने सिडनी कसोटीत झालेल्या शेरेबाजीवर मोठे वक्तव्य केले. टीम इंडियाने मैदानावर जशास तसे उत्तर कसे द्यावे आणि आक्रमक कसे असावे, याचे बीज रोवल्याचे श्रेय हॉगने माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष असलेले सौरव गांगुली यांना दिले आहे.
हॉग म्हणाला, ‘भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेत प्रतिस्पर्धा गांगुलींनीच आणली. याच आक्रमकतेमुळे ऑस्ट्रेलिया आज बॅकफूटवर आला.’ सध्या आपल्याच मैदानावर यजमान संघ बॅकफूटवर आल्याची कबुली ४९ वर्षाच्या हॉगने दिली. २००१ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख करताना हॉग म्हणाला, ‘भारतीय संघात आक्रमकता रुजविण्याचे श्रेय गांगुलीला जाते. कुठलीही भीती न बाळगता ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळा, ही भावना त्यांनी रुजविली. गांगुलींनी स्टीव्ह वॉला नाणेफेकीसाठी प्रतीक्षा करायला लावली होती, या घटनेला देखील हॉगने उजाळा दिला. ब्लेझर घालणे विसरल्यामुळे नाणेफेकीला यायला वेळ लागला, असे गांगुलींचे मत होते. याआधी ऑस्ट्रेलियाचे सर्वच कर्णधार नाणेफेकीला उशिरा यायचे.सध्याच्या मालिकेबद्दल हॉग म्हणाला, ‘आम्हाला आमच्या मैदानावर आव्हान मिळावे, हे पसंत नसते. आम्ही दडपणात येतो तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो.’ हॉगचा इशारा टीम पेन याच्या खराब वागणुकीकडे होता.