Pakistan Cricket Coach: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या (Pakistan Cricket Team) मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. गॅरी कर्स्टन यांनी याआधी आपल्या प्रशिक्षपदकाच्या कारकिर्दीत भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. कर्स्टन यांच्यासोबतच सायमन कॅटिच आणि पीटर मूर्स यांच्याही नावाची चर्चा आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मिस्बाह उल हक यानं पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूसही पदावरून पायऊतार झाले. त्यामुळे सकलेन मुश्ताकची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज वर्नन फिलँडर यांना गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान, या सर्वांचा कालावधी केवळ ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपर्यंतच असणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांना परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याची इच्छा आहे. यात गॅरी कर्स्टन यांचं नाव आघाडीवर आहे.
गॅरी कर्स्टन यांनी याआधी भारतीय क्रिकेट संघाचं मुख्य प्रशिक्षपद भूषवलं आहे. २००८ ते २०११ या कालावधीत गॅरी कर्स्टन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपदी होते. कर्स्टन यांच्याच प्रशिक्षपदाच्या कार्यकाळात २०११ साली भारतीय संघानं एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता. याशिवाय कर्स्टन यांच्याच काळात भारतीय कसोटी संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता.
गॅरी कर्स्टन यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १०१ कसोटी आणि १८५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी ७२८९ धावा केल्या आहेत. तर एकदीवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६७९८ धावा जमा आहेत. गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षक पदाचा दांडगा अनुभव असून त्यांनी अनेक संघांचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे.