Join us  

Gary Kirsten Head Coach: Team India ला वर्ल्ड कप मिळवून देणारे कोच 'गुरू गॅरी' आता नव्या 'वर्ल्ड चॅम्पियन्स'ना करणार मार्गदर्शन!

२०११ चा वन डे विश्वचषक भारताने गॅरी कर्स्टन यांच्याच मार्गदर्शनाखाली जिंकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 5:42 PM

Open in App

Gary Kirsten Head Coach: भारतीय क्रिकेट संघाला २०११चा विश्वचषक जिंकून देणारे कोच गॅरी कर्स्टन लवकरच एका नव्या आंतरराष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी दिसण्याची शक्यता आहे. २०११ च्या वन डे विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघाने गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपद पटकावले. तसेच, IPL मध्येही गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सचा संघ उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. या स्पर्धेनंतर गुरू गॅरी इंग्लंडच्या (England Test Cricket Team) कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गॅरी कर्स्टन यांची इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाशी (ECB) या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. इंग्लंडचा माळवता कर्णधार जो रूट याने नुकताच पदत्याग केला. त्यामुळे इंग्लंडचा कसोटी कर्णधार बदलणार असून नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ नव्या कसोटी मालिकेत उतरणार आहे. सध्या तरी जो रूटचा वारसदार म्हणून बेन स्टोक्सची निवड करण्यात येण्याची चर्चा आहे. त्याचसोबत इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, कर्स्टन यंदाच्या IPL हंगामानंतर गुजरात टायटन्सशी संबंधित असलेले पद सोडण्याच्या तयारीत आहेत. गॅरी कर्स्टन यांच्या कोच पदाच्या कारकिर्दीत इंग्लिश क्रिकेट संघ बहरेल, अशी बोर्डाला आशा आहे. या आधी कर्स्टन यांनी भारतीय संघाला विश्वविजेता बनवून दाखवलं आहेच. पण त्याशिवाय, दक्षिण आफ्रिकन संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कसोटी क्रमावारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यामुळे आता नव्याने बांधणी करण्यात येणाऱ्या इंग्लंड कसोटी संघाला नव्या आव्हानांसाठी गुरू गॅरी कशापद्धतीने तयार करणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२भारतीय क्रिकेट संघइंग्लंड
Open in App