लंडन : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाला प्रशिक्षण देणारे गॅरी कर्स्टन यांनी इंग्लंड संघाला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जो रूट आणि संघाचे भाग्य सावरण्यासाठी त्यांच्याकडे ठोस योजना असल्याचे कर्स्टन यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेत इंग्लंडला पहिल्या तिन्ही सामन्यांत लोळविले. यामुळे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांचे पद धोक्यात आले.
ऑस्ट्रेलियाने मेलबोर्नमध्ये तिसरा सामना केवळ अडीच दिवसांत जिंकला. कर्स्टन यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळताच वर्षभरात भारत २००९ ला कसोटीत नंबर वन बनला. नंतर त्यांनी द. आफ्रिकेला देखील हे स्थान मिळवून दिले. ‘आय न्यूज’शी बोलताना कर्स्टन म्हणाले, ‘इंग्लंडचे प्रशिक्षकपद सांभाळण्याचा मी सुरुवातीपासून विचार करीत आहे. माझ्यासाठी हा मोठा सन्मान असेल.’
कर्स्टन यांनी अशी इच्छा व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी दोनदा ते इंग्लिश संघाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या दावेदारीत होते. ते म्हणाले, ‘२०१५ आणि २०१९ ला मी शर्यतीत होतो. मी सुरुवातीपासूनच सांगितले, की तिन्ही प्रकारांत मी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे.’ आता प्रत्येक क्रिकेट बोर्ड तिन्ही प्रकारासाठी वेगवेगळे प्रशिक्षक ठेवण्याच्या विचारात आहे. यावर विचार होऊ शकतो.