जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला आहे. भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांना पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट संघांचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांना कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
गॅरी कस्टर्न हे सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे मेंटॉर म्हणून काम पाहत आहेत. कस्टर्न यांनी भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचेही तीन वर्षे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. आता टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बरोब्बर महिनाभर आधी गॅरी कस्टर्न यांची पाकिस्तानच्या टी-२० संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मिकी आर्थर यांनी प्रशिक्षक पद सोडल्यापासून हे पद रिक्त होते. आर्थर यांच्यानंतर मोहम्मद हाफिज याने पाकिस्तानच्या संघाचा संचालक म्हणून काम पाहिले, मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली होती.
गॅरी कस्टर्न यांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा झाल्यास कस्टर्न यांनी दक्षिण आफ्रिकेकडून १०१ कसोटी सामने खेळताना ४५.२७ च्या सरासरीने ७ हजार ८९ धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये २१ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश होता. तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही गॅरी कस्टर्न यांनी १८५ सामने खेळताना १२ शतके आणि ४५ अर्धशतकांसह ६ हजार ७९८ धावा काढल्या होत्या.