भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याचे नाव टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून निश्चित झाले आहे. राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. द्रविडने या पदावर कायम राहण्याची रोहित शर्माची विनंती अमान्य केली आणि त्यामुळेच BCCI ने नव्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी जाहीरात काढली. अनेक नावं या पदासाठी चर्चेत आली होती, परंतु गौतम गंभीर त्यात आघाडीवर राहिला. कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून काम करणाऱ्या गौतमने आयपीएल २०२४ मध्ये फ्रँचायझीला १० वर्षानंतर जेतेपद पटाकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी त्याची दावेदारी प्रबळ झाली.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरची नियुक्ती येत्या काही दिवसांत BCCI कडून अधिकृत केली जाईल. गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली आहे, परंतु त्याने काही मागण्या केल्या होत्या आणि त्या बोर्डाने मान्य केल्या आहेत, असे या वृत्तात सूत्राच्या हवाल्याने म्हटले गेले आहे. "भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी आम्ही गंभीरशी चर्चा केली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो राहुल द्रविडच्या जागी नियुक्त होईल," असे BCCIच्या सूत्राने दैनिक भास्करला सांगितले.
गंभीरने BCCIला सांगितले की जर त्याला सपोर्ट स्टाफ ठरवण्याची मोकळीक दिली जाईल, तरच तो हे पद स्वीकारेल. त्याची ही मागणी मान्य करण्यात आली असून या महिन्याच्या अखेरीस बोर्ड गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा करेल. रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना विक्रम राठौड यांनी संजय बांगर यांच्या जागी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. द्रविडने राठोड यांना सपोर्ट स्टाफमध्ये कायम ठेवले. सध्या पारस म्हांब्रे आणि टी दिलीप हे अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. अहवालात असेही समोर आले आहे की गंभीर केवळ सपोर्ट स्टाफमध्येच नाही तर संघातही बदल करणार आहे.
गौतम गंभीरने ५८ कसोटी व १४७ वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ४१५४ व ५२३८ धावा केल्या आहेत. शिवाय त्याने ३७ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ९३२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २० आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.