ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपणार आहे आणि टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. या पदासाठी गौतम गंभीर आणि डब्ल्यू व्ही रमण यांच्या मुलाखती झाल्या. क्रिकेट सल्लागार समितीने ४० मिनिटे या दोघांची मुलाखत घेतली. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि रमण यांनी विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली. CAC सदस्यांमध्ये अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश होता. दोघांची मुलाखत झूम कॉलवर झाली. सीएसीचे अध्यक्ष मल्होत्रा सध्या समालोचनात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत ते केवळ झूम कॉलद्वारे बैठकीसाठी उपस्थित होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, गौतम गंभीर सध्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत पुढे आहे. तथापि, बुधवारी सीएसी सदस्यांमध्ये चर्चा होणार आहे, त्यानंतर टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण होणार हे निश्चित केले जाईल. यानंतर BCCI लवकरच अधिकृत घोषणाही करणार आहे. BCCI च्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, चर्चेची एक फेरी झाली आहे आणि दुसरी फेरी आज होणार आहे. मात्र, सीएसी सदस्यांनी आपापसात काय चर्चा केली याबाबत कोणतीही माहिती नाही. परांजपे आणि नाईक सध्या मुंबईत आहेत. मात्र, पुढील तीन वर्षांचा रोडमॅप काय असेल याबाबत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
सुरुवातीला सीएसी सदस्यांनी गंभीर आणि रमण यांना भारतीय क्रिकेटबद्दल प्रश्न विचारले. त्याचबरोबर टीम इंडियातील सीनियर्स खेळाडूंवरही प्रश्न विचारला गेला. ज्यात विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांच्या नावाचा समावेश होता. रमण यांनी टीम इंडियाचा रोडमॅप देखील सांगितला आणि त्यानंतर दोघांनी एक प्रेझेंटेशन दाखवले ज्याद्वारे संघ आयसीसी ट्रॉफी कसा जिंकू शकतो याचा रोडमॅप होता.
तीन प्रश्न १. संघाच्या कोचिंग स्टाफबद्दल तुमच्या काय कल्पना आहेत?२. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये काही अधिक वयाचे खेळाडू आहेत आणि तुम्ही संक्रमणाचा टप्पा कसा हाताळाल?3. स्प्लिट कर्णधारपद, वर्कलोड मॅनेजमेंटशी संबंधित फिटनेस पॅरामीटर्स आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात संघाच्या अपयशाबद्दल तुमचे मत काय आहे?
टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होईल, त्याच्यासमोर ICC ट्रॉफी जिंकून देणे हे मोठे आव्हान असेल. यानंतर संघ प्रत्येक फॉरमॅटमध्ये कशी कामगिरी करतो याकडेही लक्ष असेल. गंभीरने फक्त आयपीएलमध्ये मेंटॉरशिप केली आहे. अशा परिस्थितीत त्याला सध्या कोचिंगचा कोणताही अनुभव नाही. पण गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने आयपीएल २०२४ जिंकली.