Gautam Gambhir Arshdeep Singh, IND vs SL 2nd T20: भारतीय संघाविरूद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या सामन्यात भारताने अटीतटीची लढत २ धावांनी जिंकल्यावर, दुसरा टी२० सामना श्रीलंकेने १६ धावांनी जिंकला. दसून शनाका आणि कुसल मेंडीस यांच्या दणकेबाज अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने २००पार मजल मारली. भारताकडून अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव आणि शिवम मावी यांनी फलंदाजीत झुंज दिली, पण अखेर भारताला १९० पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे श्रीलंकेने सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात अर्शदीप सिंगने तब्बल ५ नो बॉल टाकले. त्याच्यावरून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांने त्याच्यावर सडकून टीका केली.
"जर तुम्ही एखाद्या दुखापतीतून सावरून पुनरागमन करत आहात तर तुम्ही थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे योग्य नाही. तुम्ही आधी देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, तेथे तुम्हाला तुमच्या खेळाची लय प्राप्त होईल आणि त्यातूनच तुम्ही चांगले पुनरागमन करू शकता. दुखापतीमुळे तुम्ही जर दीर्घकाळ क्रिकेटपासून लांब असाल तर तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये किमान १५ ते २० षटके टाकली पाहिजे आणि मगच पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले पाहिजे. कारण अर्शदीप सिंग गोलंदाजी करताना गोंधळात पडल्याचे आपल्याला स्पष्ट दिसले होते," असे गौतम गंभीरने अतिशय रोखठोक मत मांडले.
अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत!
"तुम्ही आंतरराष्ट्रीय सामन्यात गोंधळू शकता, फलंदाज चुकीचे फटके मारू शकतात, फिल्डर्सची कामगिरी देखील खराब होऊ शकते. हे सगळं जरी खरं असलं तरीही तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं काहीही करण्याचा अधिकार नसतो. तुम्ही कितीही नेट्स मध्ये प्रक्टिस करा, पण सामन्यात जे घडतं त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते, त्यामुळे तुम्हाला आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरण्याआधी काहीच पर्याय नसतो. अशा वेळी गोलंदाजी प्रशिक्षकाने त्यांना सराव सत्रातच योग्य मार्गदर्शन करणे खूप गरजेचे आहे. नंतर त्यांच्यावर चिडण्यात काहीच अर्थ नाही," असे म्हणत गौतम गंभीरने कोचिंग स्टाफवरही राग व्यक्त केला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या डावाचा सुरूवात फारशी चांगली झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीला काही काळ धावांवर अंकुश लावला पण नंतर मात्र श्रीलंकेने तुफान फटकेबाजी केली. श्रीलंकेकडून दसुन शनाका आणि कुसल मेंडिस या दोघांनीही दमदार अर्धशतके ठोकली. शनाकाने २२ चेंडूत नाबाद ५६ तर मेंडिसने ३१ चेंडूत ५२ धावा केल्या. चरिथ असालांकाने देखील १९ चेंडूत ३७ धावा कुटल्या. त्यामुळेच श्रीलंकेने ६ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना अक्षर पटेलने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात शिवम मावीनेदेखील १५ चेंडूत २६ धावांची उपयुक्त खेळी केली. पण अखेर भारताला १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
Web Title: Gautam Gambhir angry on Arshdeep Singh bowling 5 no balls in single t20 match advices him to go back to domestic cricket IND vs SL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.