भारतीय संघाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. भारतीय संघ सलग १० सामने जिंकून अंतिम सामन्यात पोहोचला होता आणि ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या मोठ्या व्यक्तिंसह अनेक सेलिब्रेटीही उपस्थित होते. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींना उद्देशून 'पनौती' हा ट्रेंड सुरू झाला होता. अनेक विरोधी नेत्यांनीही यावरून राजकारण केलं. आता भारताचा माजी सलामीवीर व भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने जोरदार टीका केली आहे.
विराट कोहली ( ५४), लोकेश राहुल ( ६६) आणि रोहित शर्मा ( ४७) यांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २४० धावा उभ्या केल्या. ऑस्ट्रेलियाला ४७ धावांत ३ धक्के बसले, परंतु सलामीवीर ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांनी १९२ धावांची भागीदारी करून मॅच जिंकवली. हेडने १२० चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १३७ धावा केल्या, तर लाबुशेन ११० चेंडूंत ५८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ बाद २४१ धावा करून विजय पक्का केला. भारताच्या या पराभवानंतर पंतप्रधानांना ट्रोल केले गेले.
गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे आणि त्यात त्याने पंतप्रधानांबद्दल तो शब्द वापरणाऱ्यांना सुनावले आणि त्याचवेळी २०११ च्या सेमी फायनलच्या वेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थिवर भाष्य केले. तो म्हणाला, पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्यासाठी जो शब्द वापरला गेला होता, पनौती तो अत्यंत चुकीचा होता. असं कोणविरुद्धच विशेषतः पंतप्रधानांबद्दल बोलणे चुकीचे आहे. २०११च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. जर ती मॅच आम्ही हरलो असतो आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांनी येऊन खेळाडूंची भेट घेतली असती तर त्यात काहीच चुकीचं झालं नसतं.''