Join us  

अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर काय म्हणाला गौतम गंभीर...

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारीला पार पडणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 6:47 PM

Open in App

Gautam Gambhir on Ram Mandir: टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गंभीर त्याच्या रोखठोक आणि अचूक विश्लेषणासाठी ओळखला जातो, ज्यामुळे कधीकधी सोशल मीडियावर तो टीकेचा धनीही होतो. गंभीरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नुकतेच आपल्या चाहत्यांशी प्रश्नोत्तर सत्रात गप्पा मारल्या. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात एक प्रश्न हा राम मंदिराबद्दलचा होता. त्यावरही मुक्तपणे उत्तर दिले.

पाकिस्तानी संघाबाबतच्या प्रश्नावर उत्तर

पाकिस्तानी संघाबाबत गंभीर म्हणाला, "मी ५० षटकांच्या विश्वचषकात पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण पाहिले, जे कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वाईट असेल. जर त्यांना खरोखरच टी२० फॉरमॅटमध्ये टिकून राहायचे असेल, तर त्यांना त्यांची कामगिरी खूप जास्त सुधारावी लागेल. गेल्या पाच-सहा वर्षांत भारत जितक्या फायनलमध्ये पोहोचला आहे तितक्याच फायनलमध्ये पाकिस्तान पोहोचला आहे असे दिसते. आणि पण एक गोष्ट सातत्याने दिसते की तुम्ही ट्रॉफीपासून दूर राहत आहात."

राम मंदिर पाहायला जाणार का?

सत्रादरम्यान एका यूजरने गंभीरला विचारले की, शेकडो वर्षांनी अयोध्येत राम मंदिर बनणार आहे, तुम्ही राम मंदिर पाहायला जाणार का?, या प्रश्नाच्या उत्तरात गंभीर म्हणाला, "हो नक्कीच. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो."

गौतम गंभीर सध्या भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून लोकसभा खासदार आहे. गौतम गंभीर हा टी२० विश्वचषक २००७ आणि एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये भारतीय संघाचा सदस्य होता. गौतम गंभीरने दोन्ही स्पर्धांच्या फायनलमध्ये भारतीय संघासाठी मॅचविनिंग इनिंग खेळली होती. गंभीरने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ५४ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. तर, एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने ९७ धावांची खेळी केली होती.

टॅग्स :गौतम गंभीरअयोध्याराम मंदिरपंतप्रधान