Join us  

गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती

क्रिकेटर गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 12:55 PM

Open in App

मुंबई- क्रिकेटर गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2018च्या आयपीएलसाठी गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. बुधवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार म्हणून गौतम गंभीरच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

 IPL च्या नवीन सत्रासाठी झालेल्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने गौतम गंभीरला 2.8 कोटी रूपयांमध्ये आपल्याकडे घेतलं. त्यामुळे एकप्रकारे गंभीरचं आपल्या घरच्या संघात पुनरागमन झालं. आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची दोन जेतेपदं गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली पटकावली होती. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार गंभीरच होणार हे जवळपास स्पष्ट होतं. तसंच संघाचा कोच रिकी पॉंन्टिंगने संघाच्या कर्णधारपदाबद्दलचे संकेत पत्रकार परिषदेत दिले होते. ''सलामीवीर गौतम गंभीरच आयपीएलच्या अकराव्या सत्रात संघाचा कर्णधार असेल.  गेल्या आयपीएलमध्ये हा डावखुरा फलंदाज सर्वात उपयोगी ठरला होता. त्याने त्याच्यातील नेतृत्वक्षमता सिद्ध केली आहे. गंभीर शानदार कॅप्टन आहे'', असं पॉन्टिंगने म्हंटलं होतं. दुसरीकडे, दिल्लीच्या संघात पुनरागमन होताच गंभीरने आनंद व्यक्त केला. तसंच त्याने केकेआरच्या चाहत्यांचेही आभार मानले होते. आयपीएलच्या पहिल्या तीन पर्वांमध्ये गौतम गंभीर दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला होता. त्यानंतर गेली सात वर्षं तो कोलकाता नाइट रायडर्सचा शिलेदार होता. 

म्हणून गौतम गंभीरवर KKR ने बोली लावली नाही-गंभीरवर बोली न लावण्यामागचं कारण संघाचे व्यवस्थापकीय संचालक वेंकी मैसूर यांनी स्पष्ट केलं. 'आयपीएलच्या लिलावात गौतम गंभीरला खरेदी करण्याचं आम्ही ठरवलं होतं. 'राइट टू मॅच' कार्ड वापरून त्याला आमच्यासोबतच कायम ठेवण्याची संधी आमच्याकडे होती. पण गंभीरने आमच्याशी संपर्क साधला आणि आपल्यावर बोली न लावण्याची विनंती केली. नवं आव्हान स्वीकारायची इच्छा असल्याचं त्यानं सांगितलं. सात वर्षांच्या प्रवासानंतर गंभीरला जाऊ देणं आमच्यासाठीही दुःखदच आहे. पण कुणाच्याही प्रगतीच्या वाटेत आम्ही आडवे येऊ इच्छित नाही', असा खुलासा वेंकी मैसूर यांनी केला आहे.  

टॅग्स :गौतम गंभीरआयपीएल 2018दिल्ली डेअरडेव्हिल्स