नवी दिल्ली : भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरला आयपीएल २०२२ साठी लखनौच्या फ्रँचायझीने संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. याआधी गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावून दिले होते. तसेच त्याचा क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभव बघता लखनौ संघाने त्याला मार्गदर्शक करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत बोलताना गंभीर म्हणाला, “मी संजीव गोएंका आणि आरपीएसजी समूहाचा आभारी आहे की त्यांनी मला ही जबाबदारी दिली. सामना जिंकण्यासाठी लागणारी वृत्ती अजूनही माझ्यात शिल्लक आहे. तसेच संघाला विजेते करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहणार आहे.” गंभीरने भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
आयपीएल २०२२च्या हंगामात दाखल होणाऱ्या दोन नव्या संघांपैकी लखनौचा संघ एक आहे. अजूनपर्यंत त्यांनी संघाचे नामकरण केलेले नाही. मात्र गंभीरच्या नियुक्तीमुळे त्यांनी संघबांधणीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. लखनौ फ्रँचायझीचे मालक संजीव गोएंका यांनी गंभीरचे आरपीएसजी परिवारात स्वागत केले आहे.