बेंगळुरूः ज्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची दोन जेतेपदं पटकावली, त्या गौतम गंभीरकडे केकेआरच्या मालकांनी सपशेल दुर्लक्ष केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण, गंभीरवर बोली न लावण्यामागचं कारण संघाचे व्यवस्थापकीय संचालक वेंकी मैसूर यांनी स्पष्ट केलं आहे.
'आयपीएलच्या लिलावात गौतम गंभीरला खरेदी करण्याचं आम्ही ठरवलं होतं. 'राइट टू मॅच' कार्ड वापरून त्याला आमच्यासोबतच कायम ठेवण्याची संधी आमच्याकडे होती. पण गंभीरने आमच्याशी संपर्क साधला आणि आपल्यावर बोली न लावण्याची विनंती केली. नवं आव्हान स्वीकारायची इच्छा असल्याचं त्यानं सांगितलं. सात वर्षांच्या प्रवासानंतर गंभीरला जाऊ देणं आमच्यासाठीही दुःखदच आहे. पण कुणाच्याही प्रगतीच्या वाटेत आम्ही आडवे येऊ इच्छित नाही', असा खुलासा वेंकी मैसूर यांनी केला आहे.
आयपीएलच्या पहिल्या तीन पर्वांमध्ये गौतम गंभीर दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला होता. त्यानंतर गेली सात वर्षं तो कोलकाता नाइट रायडर्सचा शिलेदार होता. परंतु, आयपीएल-11 मध्ये केकेआरसोबत राहणार नसल्याचे संकेत गंभीरनं अलीकडेच दिले होते. एखाद्या संघाचा मार्गदर्शक होण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली होती. त्यामुळे लिलावात त्याच्यावर कोण आणि किती मोठी बोली लावतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु, गंभीरबाबत कुणीच फारसं गंभीर दिसलं नाही. दिल्ली डेअरडेविल्सनं त्याला 2 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केलं.
एकेकाळी आयपीएलमध्ये जबरदस्त भाव खाणाऱ्या सिक्सर सम्राट युवराजसिंगच्या पदरीही आज निराशाच पडली. त्याला किंग्स इलेव्हन पंजाबनं बेस प्राइजला, अर्थात दोन कोटींना विकत घेतलं.
Web Title: Gautam Gambhir asked us not to bid for him or use RTM says Kolkata Knight Riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.