मुंबई, दि. 21 - श्रीलंकेतील एकदिवसीय मालिका आणि एका टी-20 सामन्यासाठी युवराज सिंगला भारतीय क्रिकेट संघात स्थान न दिल्याने गौतम गंभीरने सिलेक्टर्सना खडे बोल सुनावले आहेत. निवड समितीने वापरलेल्या आराम या शब्दावर आक्षेप घेत या ठिकाणी हा शब्द योग्य नव्हता असंही गौतम गंभीर बोलला आहे. युवराज सिंगला आराम दिला असल्याचं निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं होतं. तसंच दरवाजे कोणासाठीही बंद झालं नसल्याचंही ते बोलले होते.
'युवराज सिंग गेल्या अनेक दिवसांपासून खेळलेलाच नाही, त्याची खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळे 'आराम' हा शब्द वापरणं मला योग्य वाटत नाही. जर त्याने वर्ल्ड कपमध्ये खेळावं असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याला जास्तीत जास्त संधी दिली गेली पाहिजे. कारण युवराजसारखा खेळाडू प्रवाहात असला पाहिजे, त्याची लय जाता कामा नये. तुम्ही त्याला एक मालिका खेळवली आणि नंतर आराम दिला असं होत नाही', असं स्पष्ट मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.
यावेळी बोलताना गौतम गंभीरने युवराज सिंगला संघात पुन्हा स्थान मिळवणं खूप कठीण जाणार असल्याचंही सांगितलं आहे. 'युवराज सिंगला पुन्हा कमबॅक करणं खूप कठीण जाईल असं मला वाटतं. तो एक उत्कृष्ट खेळाडू असून तो सर्वांवर मात करेल असा विश्वास आहे', असंही गौतम गंभीर बोलला आहे.
श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी युवराज सिंग आणि सुरेश रैना या डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान मिळालेले नाही. फलंदाजीतील कामगिरी नव्हे तर खराब फिटनेसमुळे त्यांना संघातून वगळण्यात आल्याचे समोर आले होते. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये (एनसीए) यो-यो नावाच्या फिटनेस चाचणीत नापास झाल्याने या दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना नियमितपणे विविध प्रकारच्या तंदुरुस्तीच्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये यो-यो ही तंदुरुस्ती चाचणी महत्त्वाची आहे. याआधीचे क्रिकेटपटू ज्या तंदुरुस्ती चाचण्यांमधून जात असत त्यापेक्षा ही चाचणी अधिक अद्ययावत आहे. सध्याचा भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी तंदुरुस्त मानला जातो. या संघासाठी यो-यो चाचणीमध्ये सरासरी 19.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळवणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे. या चाचणीनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली हा सर्वात तंदरुस्त क्रिकेटपटू आहे. त्याची यो-यो चाचणीमधील गुणसंख्या 21 हून अधिक भरते. मात्र युवराज आणि रैनाला या चाचणीत 19.5 हून खूप कमी मिळाले. या चाचणीत युवीला केवळ 16 गुण मिळवता आले. त्यामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले.
सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तंदुरुस्तीच्या बाबतीत कोणतीही हयगय न करण्याचे धोरण आखले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूसुद्धा अशा यो-यो चाचणीला सामोरे जातात. त्यांची सरासरी गुणसंख्या 21 एवढी भरते. भारतीय संघामध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे यो-यो चाचणीत सातत्याने 21 हून अधिक गुण मिळवतात. तर बाकीचे खेळाडू 19.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळवतात, असे बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.