Sanjay Manjrekar Gautam Gambhir, India vs Australia: भारतीय संघ एकीकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी२० मालिका खेळत आहे, तर दुसरीकडे भारताचा कसोटी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. २२ नोव्हेंबरला टीम इंडिया ( Team India ) ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेत आगामी नियोजनाबद्दल सांगितले. यावेळी त्याने पत्रकारांच्या काही खोचक प्रश्नांना त्याच भाषेत उत्तरे दिली. हा प्रकार मुंबईकर माजी क्रिकेटर संजय मांजरेकरांना रुचला नाही. त्यांनी यावरून BCCI ला खास विनंती केली.
काय म्हणाले संजय मांजरेकर?
"मी गौतम गंभीरची पत्रकार परिषद पाहिली. माझी बीसीसीआयला नम्र विनंती आहे की गौतम गंभीरला पत्रकार परिषदांना बसवू नये. त्याला पडद्यामागील कामे करू द्या. पत्रकारांशी किंवा प्रसारमाध्यमांशी योग्य पद्धतीने सुसंवाद साधेल असे त्याचे आचरण नसते. तो बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून पत्रकारांसमोर बसतो मात्र तो जे बोलतो ते योग्य नसते. त्याच्या बोलण्यात अतिआक्रमकता असते. बीसीसीआयला जेव्हा पत्रकार परिषद घ्यायची असेल तेव्हा रोहित शर्मा आणि अजित आगरकर या जोडीला बसवा, पण गंभीरला वगळा," अशा शब्दांत संजय मांजरेकरांनी गंभीरवर टीकास्त्र सोडले.
गौतम गंभीर पत्रकार परिषदेत काय म्हणाला?
गंभीर म्हणाला, "रिकी पॉन्टींगला भारतीय क्रिकेटशी काय घेणं देणं आहे? मला असं वाटतं की विराट किंवा रोहितबद्दल बडबड करण्यापेक्षा त्याने त्याच्या ऑस्ट्रेलियन संघाकडे लक्ष द्यावं. विराट आणि रोहित दोघेही अतिशय प्रतिभासंपन्न क्रिकेटपटू आहेत. भारतीय क्रिकेटसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली अनेक वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहेत. भविष्यातही ते दमदार खेळ करतील याची आम्हाला खात्री आहे कारण दोघेही अनुभवी असले तरी नियमित सराव करत असतात. दोघांना खेळाची आवड असून नवे विक्रम करण्याची इच्छा आहे. सतत चांगला खेळ करण्याची भूक असणे ही ड्रेसिंग रूममधील जमेची बाब आहेत. गेल्या कसोटी मालिकेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर खेळाडू दमदार पुनरागमन करण्यास उत्सुक आहेत," असेही गंभीर म्हणाला.