भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला. या निकालासह कर्णधार विराट कोहलीनं विश्वविक्रमाची नोंद केली. भारतानं मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शिवाय कोहलीनं फॉलोऑन देऊन 8व्यांदा सामना जिंकून माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रमही मोडला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 200 गुणांसह अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
कोहलीच्या या विक्रमी कामगिरीचे कौतुक करताना महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा कोहली वेगळा का आहे, ते माजी सलामीवीर गौतम गंभीरने सांगितले. तो म्हणाला,''तुम्ही पराभवाला घाबरलात, तर कधीच विजय मिळवू शकत नाही आणि कोहली कधीच पराभवाला घाबरला नाही. आपण सर्व सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल बोलत आलोय, परंतु विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ परदेशातही विजय मिळवू लागला आहे.''