मुंबई : आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरने गुरुवारी मोठा खुलासा केला. त्याचे आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात वाद होता आणि भारतीय चाहत्यांध्ये या चर्चा नेहमी रंगल्या होत्या. मात्र, गंभीरने या चर्चांवर आपली बाजू स्पष्ट केली. 2011च्या विश्वचषक स्पर्धेतील नायक असलेल्या गंभीरला 2015 च्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याने नाराजीही प्रकट केली होती. गंभीर म्हणाला, ''धोनी आणि माझ्यात कोणताच वाद नव्हता.'' गंभीरला यावेळी निवृत्तीसाठी सामन्याचे आयोजन करायला हवे का असे विचारले त्यावर तो म्हणाला,''प्रत्येक क्रिकेटपटूसाठी निरोपाचा सामना असायलाच हवा, असे नाही.''
धोनीसोबत वाद नसल्याचे जरी गंभीरने सांगितले असले तरी 2015च्या विश्वचषक स्पर्धेत स्थान न मिळाल्याने नाराज असल्याचे स्पष्ट केले. '' माझ्यासोबत खेळणाऱ्या खेळाडूंना 2-3 विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. माझ्या वाट्याला एकदाच ही संधी आली. पण, या संधीत मी विश्वचषक जिंकू शकलो, याचा आनंद आहे. संघाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या खेळाडूला जेतेपद कायम राखण्यासाठी संधी द्यायला हवी. 2015 मध्ये मला ती नाही मिळाली याचे वाईट वाटते,'' असे गंभीरने सांगितले.