अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने अवघ्या एका गड्याने बाजी मारताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) नमवले. सातत्याने पारडे बदलत राहिलेल्या या सामन्यात लखनौने अखेरपर्यंत झुंज देताना आरसीबीच्या हातून सामना हिसकावला. प्रथम फलंदाजी केलेल्या आरसीबीने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्यानंतर लखनौने २० षटकात ९ बाद २१३ धावा केल्या.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची चौथ्या षटकात ३ बाद २३ धावा अशी अवस्था करत आरसीबीने आपला विजय जवळपास निश्चित केला होता. परंतु, मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन यांनी सामन्याचे चित्र पालटताना स्फोटक अर्धशतक झळकावले. स्टोइनिसने कर्णधार लोकेश राहुलसह चौथ्या गड्यासाठी ४० चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली.
दोघे पाठोपाठच्या षटकात परतले. मात्र, पूरनने अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक ठोकत आयुष बदोनीसह सहाव्या गड्यासाठी ३५ चेंडूंत ८४ धावांची तुफानी भागीदारी केली. यामध्ये पूरनने तब्बल ५६ धावांचा चोप दिला. मोहम्मद सिराजने १७व्या षटकात त्याला बाद केल्यानंतर बदोनी, जयदेव उनाडकट, मार्क वूड, रवी बोश्नोई आणि आवेश खान यांनी लखनौला थरारक विजय मिळवून दिला.
बंगळुरूचा पराभव आणि लखनऊच्या विजयानंतर मैदानावर भावनांचे वातावरण पाहायला मिळाले. आरसीबीचे खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांचे चेहरे निराशेने पडले होते. तर लखनऊच्या खेळाडूंच्या आनंदाला कुठे जागा नव्हती. पण या सगळ्यांमध्ये ज्याची प्रतिक्रिया सर्वाधिक व्हायरल झाली आहे ती म्हणजे गौतम गंभीर. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. लखनऊच्या विजयानंतर गौतम गंभीरचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
दरम्यान, विराट कोहली (के), ग्लेन मॅक्सवेल (जी) आणि फाफ डुप्लेसिस (एफ) या आरसीबीच्या 'केजीएफ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्रिकुटाने आक्रमक अर्धशतक झळकावले. कोहली आणि फाफ यांनी प्रत्येकी ३५ चेंडूंत, तर मॅक्सवेलने २४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. कोहलीने फाफसह ६९ चेंडूंत ९६ धावांची जबरदस्त सलामी दिली. कोहली बाद झाल्यानंतर फाफ-मॅक्सवेल यांनी दुसऱ्या गड्यासाठी केवळ ५० चेंडूंत ११५ धावांची भागीदारी केली. अखेरच्या पाच षटकांमध्ये आरसीबीने ७५ धावा कुटल्या. आरसीबीकडून सिराज व वेन पार्नेल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.