Gautam Gambhir vs Sreesanth: गौतम गंभीर आणि वाद हे समीकरण क्रिकेटप्रेमींसाठी फारसे नवीन नाही. कधी तो आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबतच्या भांडणामुळे चर्चेत असतो तर कधी त्याच्या वक्तव्यांमुळे तो चर्चेत राहतो. पण अलीकडेच तो टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतसोबत भिडला. निमित्त होते लेजेंड्स लीग क्रिकेट सामन्याचे. त्या सामन्यात श्रीसंत आणि गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. या दरम्यान गंभीरने आपल्याला 'फिक्सर' म्हटल्याचा आरोप श्रीसंतने केला होता. श्रीसंतच्या या आरोपांनंतर गौतम गंभीर पहिल्यांदाच मीडियासमोर आला आणि जेव्हा त्याला त्या विषयावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो संतापला आणि त्याने रोखठोक उत्तर दिले.
गौतम गंभीर 'खेलो इंडिया' कार्यक्रमात सहभागी झाला होता. तिथे त्याला श्रीसंतसोबतच्या भांडणावर प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न गंभीरने ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीसे बदलले आणि त्याने रोखठोक उत्तर दिले."मी या विषयावर बोलण्यासाठी येथे आलेलो नाही. देशाची शान असलेल्या युवा खेळाडूंना पाहायला मी इथे आलो आहे. त्यांना मिळालेले व्यासपीठ महत्त्वाचे आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून ते प्रामाणिकपणे स्वतःला, आपल्या कुटुंबाला, राज्याला आणि देशाला गर्व वाटावा अशी कामगिरी करतील"
दरम्यान, श्रीसंतने गौतम गंभीरवर आरोप केल्यानंतर त्याला लिजेंड्स लीग क्रिकेटच्या आयुक्तांकडून कायदेशीर नोटीस मिळाली होती. श्रीसंतने गौतम गंभीरवर एका व्हिडिओद्वारे आरोप केले होते, जे लीगच्या कराराचे उल्लंघन होते. मात्र, श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यातील लढतीत हस्तक्षेप करणाऱ्या पंचांनी त्यांच्या अहवालात श्रीसंतला 'फिक्सर' म्हटले गेलेल्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. दरम्यान या प्रकरणी गंभीरने मात्र अद्याप कोणतेही थेट उत्तर दिलेले नाही.