Ind vs Aus : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून मेलबर्न कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक नसल्याचे समोर आलं आहे.भारतीय टीमने २०.४ षटकात सात विकेट गमावल्यानंतर आणि मेलबर्न कसोटी ऑस्ट्रेलियाकडे सोपवल्यानंतर लगेचच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सोमवारी ड्रेसिंग रूममध्ये संपूर्ण संघाला कठोर शब्दात झापलं आहे. गौतम गंभीरने आता बस झालं म्हणत टीमच्या सदस्यांना सुनावलं आहे. यासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळाडूंना अल्टिमेटम दिला आहे की, जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना संघातून वगळण्यास मागेपुढे पाहणार नाही.
मेलबर्न कसोटी सामन्यातील पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये आपला राग काढला. या सामन्यात भारत अनिर्णित स्थितीत पोहोचला होता, पण अखेरच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात संघाच्या खराब फलंदाजीने मानहानिकारक पराभव स्विकारावा लागला. पराभवानंतर गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन स्पष्ट शब्दात बस्स झाले असं खेळाडूंना सांगितले. काही खेळाडू संघाचा विचार करत नाहीयेत, असाही आरोप गौतम गंभीरने केला.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, खेळाडू परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी नैसर्गिक खेळाच्या नावाखाली हवे ते करत होते, असे त्याला म्हणायचे होते. मात्र आता असे होणार नाही. आता खेळाडू नैसर्गिक खेळ खेळणार नसून त्याच्या सांगण्यानुसार खेळणार आहेत. यादरम्यान गंभीरने निष्काळजीपणामुळे विकेट गमावणाऱ्यांना फटकारले.
प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून गंभीरने गेल्या सहा महिन्यांपासून संघाला जे हवे होते ते कसे करू दिले होते. परंतु आता त्यांनी कसे खेळायचे हा निर्णय गौतम गंभीर घेणार असल्याचे बोलले जात आहे. जे त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणार नाहीत त्यांना बसवण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. यावेळी गंभीरने संघाचे हित यांच्यातील संघर्षावर भाष्य केले. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेपासून फलंदाजांची खराब कामगिरी होत असल्याबाबतही चर्चा गंभीरने केली.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत संघ १-२ ने पिछाडीवर असताना भारत अजूनही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. मात्र, आता त्यांचा मार्ग अवघड झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन गंभीरने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Title: Gautam Gambhir got angry at Team India in the dressing room after the Melbourne Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.