नवी दिल्ली : भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे मात्र देशात क्रिकेटने प्रगतीचे शिखर गाठले आहे. क्रिकेटचा खेळ सर्वात लोकप्रिय भारतात असल्याचे पाहायला मिळते. भारतात जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग इंडियन प्रीमिअर लीग (IPL) खेळवली जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट प्रशासकीय संस्था आहे. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असल्यामुळे भारतातील क्रिकेटपटूंना मानधन देखील चांगले मिळत असते.
क्रिकेटला सर्वांचे प्रेम मिळत आहे मात्र भारतात इतर खेळांची प्रगती होणे कठीण होत चालले आहे. त्यामुळेच ऑलिम्पिक खेळांच्या बाबतीत भारताकडे सर्वोत्तम क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. सरकार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करत असले तरी अधिकाधिक तरुणांना क्रिकेटनेच आकर्षित केले आहे. इतर खेळांकडे होत असलेले दुर्लक्ष हा चिंतेचा विषय आहे. याचाच प्रत्यय देणारे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय फुटबॉल संघ अद्याप फिफा विश्वचषक खेळू शकला नाही. भारताकडे ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत फक्त दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके आहेत.
दरम्यान, क्रिकेटने प्रगतीचे शिखर गाठलेल्या देशात इतर खेळ मागे राहत आहेत. यावर भाष्य करताना भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. गंभीरने प्रत्येक भारतीय राज्याने एक खेळ निवडावा आणि त्याच्या वाढीसाठी कार्य करावे असा सल्ला दिला. तसेच भारताच्या माजी सलामीवीराने सुचवले की भारतीय क्रिकेट मंडळाने देशातील ऑलिम्पिक खेळांच्या विकासासाठी 50% महसूल द्यावा.
क्रिकेटमधून मिळणारा 50% महसूल क्रिकेटपटूंसाठी पुरेसा गौतम गंभीरने एका मुलाखतीत बोलताना म्हटले, "जर तुम्ही माझे मत विचारत असाल तर मला वाटते की बीसीसीआयने आपल्या कमाईतील 50% महसूल इतर सर्व ऑलिम्पिक खेळांना द्यायला हवा. कारण क्रिकेटमधून मिळणारा 50% महसूल क्रिकेटपटूंसाठी पुरेसा आहे." गौतम गंभीरने या मुलाखतीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"