Join us  

"तुम्ही किती धावा करता याला किंमत नाही तर...", गौतम गंभीरचा बाबर आझमला मोलाचा सल्ला

भारताविरूद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:15 PM

Open in App

आयसीसी वन डे विश्वचषकात सलग आठव्यांदा पाकिस्तानी संघाला भारताविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला. १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. यजमानांविरूद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर शेजाऱ्यांची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला एक खास सल्ला दिला आहे. पाक दिग्गज वसिम अक्रमचे उदाहरण देताना गंभीरने बाबरला काही सल्ले दिले. 

"केवळ वैयक्तिक कामगिरी करून मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवता येत नाही. वसिम अक्रमने १९९२ च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे दाखवून दिले होते", असे गंभीरने नमूद केले. बाबरला सल्ला देताना गंभीरने सांगितले की, पाकिस्तानी कर्णधाराने वैयक्तिक माइलस्टोनकडे पाहून चालणार नाही. बाबरने सर्वाधिक धावा करून संघाच्या विजयात योगदान देणे गरजेचे आहे. अक्रमने १९९२ च्या फायनलमध्ये तीन बळी घेतले होते. त्याने त्यावेळी बळींचा 'पंच' घेतला नाही पण सर्वजण आजही पाकिस्तानने १९९२ चा विश्वचषक उंचावला असे म्हणतात. कोणीच सांगत नाही की, महेला जयवर्धनेने २०११ च्या अंतिम सामन्यात शतक झळकावले होते. पण, भारताने विश्वचषक जिंकला होता हे सर्वांच्या तोंडी असते.

बाबरला गंभीरचा खास सल्ला गंभीरच्या म्हणण्यानुसार, तुम्ही किती धावा करता याला किंमत नाही तर संघाच्या विजयात किती योगदान देता हे मोजले जाते. बाबर आझम मागील जवळपास दोन वर्षांपासून आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे त्याने अधिक जबाबदारीने खेळण्याची गरज असल्याचे गंभीरने सांगितले. "आधीच्या पाकिस्तानी संघात शाहिद आफ्रिदी, इम्रान नाझीर, सईद अन्वर आणि आमिर सोहेल यांसारखे स्फोटक खेळी करणारे फलंदाज होते. पण, विद्यमान संघातील पहिले तीन फलंदाज एकाच प्रकारची खेळी करतात. त्यामुळे जर एखाद्याने जबाबदारी घेतली, याशिवाय तीन नंबरवर खेळणाऱ्या बाबरने हे काम केले तर अधिक चांगले होईल", असेही गौतम गंभीरने स्पष्ट केले. 

बाबर आझमचे अर्धशतक व्यर्थ पाकिस्तानचा मोठा पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने भारताविरूद्ध अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानगौतम गंभीरबाबर आजम