Gautam Gambhir On ODI Rules : यंदाचा वन डे विश्वचषक पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर शेजाऱ्यांना सलग चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आयसीसी क्रमवारीत जरी अव्वल स्थानी असला तरी त्याला चालू विश्वचषकात प्रभावी खेळी करता आली नाही. बाबरच्या खेळीबद्दल बोलताना भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने क्रिकेटच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये ११ ते ४० षटकांदरम्यान चार क्षेत्ररक्षक बाहेर ठेवणे आणि दोन नवीन चेंडूंच्या नियमाला गंभीरने विचित्र म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान गंभीरने हे प्रश्न उपस्थित केले. खरं तर चार क्षेत्ररक्षक बाहेर ठेवले तर बाबर आझम ५०-६० शतके झळकावेल असेही गंभीरने म्हटले. समालोचन करताना डावखुरा माजी भारतीय दिग्गज म्हणाला की, ११-४० षटकांदरम्यान ४ क्षेत्ररक्षकांना बाहेर ठेवण्याचा नियम खूप विचित्र आहे. बाबरने १०३ डावात १९ शतके झळकावली असून हा नियम कायम राहिला तर तो ५०-६० शतके ठोकेल, असे भाकीत गंभीरने वर्तवले.
गंभीरने वाचली नियमावलीनियमांबद्दल भाष्य करायचे झाले तर, वन डेमध्ये पहिल्या पॉवरप्लेनंतर म्हणजेच १ ते १० षटकांनंतर ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक राहतात. यानंतर, १० ते ४० षटकांदरम्यान ३० यार्ड सर्कलच्या बाहेर चार खेळाडू ठेवण्याची मुभा असते. लक्षणीय बाब म्हणजे फक्त चार खेळाडू बाहेर असणे हे फलंदाजांसाठी काहीसे फायदेशीर आहे.
पाकिस्तानच्या पराभवाचा चौकारचेन्नई येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा सलग चौथा पराभव झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानचा संघ ४६.४ षटकांत २७० धावांवर सर्वबाद झाला. संघासाठी सहाव्या क्रमांकावर आलेल्या सौद शकीलने ५२ धावांची सर्वाधिक खेळी केली. २७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने एक गडी राखून विजय मिळवला आणि पाकिस्तानने पराभवाचा चौकार लगावला.