नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ आशियाई किंग्ज श्रीलंकेविरूद्ध मायदेशात ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर यजमान भारत रोहित शर्माच्या नेतृत्वात वन डे मालिकेत श्रीलंकेशी भिडणार आहे. 2023च्या वर्षात आयसीसीचा वन डे विश्वचषक पार पडणार आहे, 2011 मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला चितपट करून वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचला होता. त्यामुळे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे सर्वत्र कौतुक होत असते.
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्पर्धेत भारताने धोनीच्या नेतृत्वात विजय मिळवला होता. भारतीय संघाने कुमार संगकारा अँड कंपनीला पराभूत करून क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद इतिहासात केवळ दुसऱ्यांदा जिंकले. या पूर्वी 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारताने ही किमया साधली होती. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर भारताला जेतेपदाचा मान पटकावता आला.
गौतम गंभीरचं मोठं विधान खरं तर हा सामना महेंद्रसिंग धोनीच्या विजयी षटकार आणि गौतम गंभीरच्या 97 धावांच्या शानदार खेळीसाठी लक्षात ठेवला जातो. या अंतिम सामन्यात भारताचे सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले होते. त्यानंतर गौतम गंभीर (97) आणि महेंद्रसिंग धोनीने नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लक्षणीय बाब म्हणजे या विजयाचा खरा हिरो झहीर खान असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे.
"2011 च्या विश्वचषकाचा खरा हिरो झहीर खान"स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गंभीर म्हणाला, "लोक महेंद्रसिंग धोनीच्या विजयी षटकाराबद्दल बोलतात, त्या सामन्यात मी 97 धावा केल्या होत्या, पण झहीर खानने वर्ल्ड कप फायनलसाठीचा मार्ग तयार केला होता. त्यामुळे तोच खरा विश्वचषकाचा हिरो आहे". या विश्वचषकातील भारताच्या विजयात गौतम गंभीरचा मोलाचा वाटा होता. तसेच झहीर खानने या स्पर्धेत सर्वाधिक 21 बळी घेतले होते. तर अंतिम सामन्यात झहीर खानने 10 षटकांत 60 धावा देऊन महत्त्वाचे 2 बळी पटकावले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"