Gautam Gambhir On Ganguly vs Kohli Battle : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली/BCCI असे वाद सुरू आहेत. विराटनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेतले गेले. त्यानंतर विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. विराटच्या बोलण्यातून अनेक वादांना तोंड फुटले. त्यावर टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु हा वाद इथेच मिटलेला नाही. त्यावर आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं मोठं विधान केलं आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराटनं त्याच्या नेतृत्वाखाली ही अखेरची स्पर्धा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं त्याच्याकडून वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटनं जोरदार फटकेबाजी करून BCCI विरुद्ध बंडच पुकारले. आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला.
या संपूर्ण प्रकरणावर गौतम गंभीरनं त्याचं मत मांडले आणि हा अंतर्गत वाद योग्य रितीनं हाताळला गेला पाहिजे होता अन् तोही बंद दरवाज्यात.. '' हा वाद बंद दरवाजात सोडवायला हवा होता. हा अंतर्गत वाद होता. या वादानं अनेक न्यूज चॅनेल्सना चांगला TRP मिळवून दिला. तुम्ही या प्रकरणाच्या मुळाशी गेलात तर तो सहज सोडवता येईल. ही मोठी समस्या अजिबात नाही,''असे गंभीर म्हणाला.
Times Now ला दिलेल्या मुलाखतीत गंभीर पुढे म्हणाला, ''प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर जो वाद निर्माण केला गेलाय, त्यात मला कोणतीच काँट्रोव्हर्सी दिसत नाही. कर्णधारपदाबाबत बोलायचं झाल्यास, विराटनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहायला हवं होतं. पण, त्यानं जेव्हा ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले, त्याचवेळी त्यानं वन डे संघाचे नेतृत्वही सोडायला हवं होतं. मर्यादित षटकांच्या क्रिकेटबाबत बीसीसीआय व निवड समितीची त्यांची भूमिका होती. कसोटी कर्णधारपद सोडणं हा विराटचा वैयक्तिक निर्णय होता.''
विराट कोहलीनं सोमवारी महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण देताना, लीडर होण्यासाठी कर्णधार असण्याची गरज नाही असे विधान केले होते.