नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रातून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्यावर टीका केली होती. गंभीरचे कर्तृत्व काहीच नाही, परंतु त्याचा तोरा फार मोठा असतो, असे दावा आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. त्याला शनिवारी गंभीरने सडेतोड उत्तर दिले. आफ्रिदीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा अप्रत्यक्षित टोला गंभीरने लगावला. आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात अनेकदा मैदानावरही शाब्दीक चकमक झालेली पाहायला मिळाली आहे. आता इतक्या वर्षांनंतरही या दोन खेळाडूंमध्ये मैदानाबाहेरही वाद सुरूच आहे.
क्रिकेटवर्तुळात 'बुम बुम आफ्रिदी' म्हणून ओळखला जाणारा आफ्रिदी पुन्हा वादात सापडला आहे. आपल्या आत्मचरित्रात खरी जन्मतारीख सांगून त्यानं, आपण किती सत्यवचनी आहोत, हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. मात्र, 23 वर्षं तू खोटं का बोलत होतास, वय का लपवत होतास?, असा 'बाउन्सर' नेटिझन्सनी त्याला टाकलाय. आफ्रिदीनं खरं वय सांगितल्यानंतर आता आयसीसी त्याला 'जोर का झटका' देण्याची शक्यता आहे. माझा जन्म 1980 सालचा नव्हे, तर 1975 चा आहे. श्रीलंकेविरोधात 1996 मध्ये मी 37 चेंडूत शतक झळकावलं, तेव्हा मी 16 नव्हे 19 वर्षांचा होता, असं शाहिद आफ्रिदीने 'गेम चेंजर' या आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. याच आत्मचरित्रात त्याने गंभीरवरही टीका केली आहे. त्याने लिहिले की,''कर्तृत्व काही नसताना गंभीर तोरा मिरवत होता. प्रतिस्पर्धी आक्रमक असला तरी चालेल, परंतु तो सकारात्मक असावा, गंभीरकडे सकारात्मकता नाहीच.''
आफ्रिदीच्या या वक्तव्यावर गंभीरने पलटवार केला आहे. त्याने आफ्रिदीला मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला,''शाहिद आफ्रिदी काहीही बरळतोय. असो, आम्ही पाकिस्तानींना वैद्यकीय विझा देतोय. आफ्रिदीलाही तो मिळेल आणि त्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी मी घेतो. तुला चांगली वैद्यकीय सेवा मिळवून देईन.''