Join us  

Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा

Gautam Gambhir Interview: मिळालेल्या वृत्तानुसार, गंभीरसोबत आणखी एक जणही आला होता. तो कोण होता? त्याचे कारण काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 1:36 PM

Open in App

Gautam Gambhir Interview: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने या पदासाठी मुलाखत दिली असल्याचे सांगितले जात आहे. ही मुलाखत मुंबईत झाली. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) मुलाखत घेतली. या पदासाठी गंभीर हा एकमेव अर्जदार असल्याचेही समजते. मुलाखतीनंतर आता या पदाबाबतची अधिकृत घोषणा कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

आणखी एकाचीही झाली मुलाखत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीर आणि बीसीसीआय यांच्यात सर्व बाबींवर आधीच चर्चा झाली आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट बोर्डानेही गंभीरच्या सर्व अटी मान्य केल्या असल्याचे बोलले जात आहे. त्याला त्याच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ देण्यात यावा, अशी गंभीरची मागणी होती. तसेच गंभीरने संघातील काही बदलांबाबतही भूमिका मांडली होती. या अटी बीसीसीआयला मान्य असल्याचे सांगितले जात आहे. तीन सदस्यीय CAC समितीमध्ये अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. आज तकच्या वृत्तानुसार, गंभीरसोबत या मुलाखतीत सिलेक्टर पदासाठीही एका उमेदवाराचा सहभाग होता. मात्र, त्या व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

गंभीरने नुकतीच घेतली होती अमित शाह यांची भेट

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने IPL 2024 चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर गंभीरच्या ट्रेनिंगबाबत अनेकांकडून सकारात्मक चर्चा ऐकायला मिळाल्या. काही दिवसांपासून गंभीरची निवड जवळपास निश्चित मानली जात असताना, सोमवारी गंभीरने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ट्विटरवर फोटो शेअर करताना गंभीरने लिहिले की, माननीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गृहमंत्री म्हणून त्यांचे नेतृत्व आपल्या देशाची सुरक्षा आणि स्थैर्य आणखी मजबूत करेल.

द्रविडचा कार्यकाळ या महिन्यात संपणार

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ T20 विश्वचषक 2024 नंतर संपत आहे. 2021च्या T20 विश्वचषकानंतर द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. त्याचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषक 2023 पर्यंत होता, पण नंतर बीसीसीआयने त्याला मुदतवाढ दिली.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघराहुल द्रविडअमित शाहभारतीय क्रिकेट संघ