भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सर्वात संयमी अन् शांत कर्णधार म्हणून ओळखला जातो. परिस्थिती कशीही असो तिच्यासमोर न डगमगता शांततेनं तिचा सामना करण्याची धोनीची वृत्ती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीला भडकलेलं कधीच कोणी पाहिलं नाही. पण, भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यानं सांगितलेला किस्सा तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडेल. कॅप्टन कूल धोनीनं चक्क बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्ये आदळआपट केल्याचं इरफाननं सांगितले. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात इरफाननं हा किस्सा सांगितला. यावेळी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली यांनीही आपापली मतं व्यक्त केली.
Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!
धोनीसोबत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणारा गंभीर म्हणाला,''लोकं म्हणतात त्यांनी धोनीला कधीच रागावताना पाहिलं नाही, परंतु मी अनेकदा पाहिलं आहे. 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानची तो प्रसंग आहे. तोही माणूस आहे आणि त्यालाही भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. त्यात काही चूकीचं नाही. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतानाही कोणी ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं किंवा झेल सोडला, तर तो रागावतो. पण, तो इतर कर्णधारांपेक्षा अधिक कूल आहे. माझ्यापेक्षाही अधिक शांत आहे.''
माजी क्रिकेटपटू इरफान पठाननं सांगितलेला किस्सा भन्नाट आहे. त्यानं सांगितलं की,''2006-07चा हा प्रसंग आहे. वॉर्म अप करताना आम्ही एक खेळ खेळलो. त्यात डावखुरा फलंदाज उजव्या हातानं, तर उजव्या हातानं फलंदाजी करणारा खेळाडू डाव्या हातानं फलंदाजी करणार होता. वॉर्म अपनंतर आम्ही सरावाला जाणार होतो. वॉर्म अप सामन्यात दोन संघांची विभागणी झाली. त्यात धोनी बाद झाला होता, परंतु त्याला तसं वाटत नव्हतं. तेव्हा त्यानं बॅट फेकली आणि ड्रेसिंग रुममध्ये जाऊन आदळ आपट केली. सरावासाठीही तो उशीरा आला होता.''
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला