न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पराभवाची जबाबदारी वरिष्ठ भारतीय खेळाडूंची आहे, असे भारताचा माजी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने म्हटले आहे; तर प्रशिक्षक गौतम गंभीरला दोषी ठरवणे अयोग्य आहे, असे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी म्हटले. भारताने शनिवारी पुण्यात न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना ११३ धावांनी गमावला. या पराभवामुळे पाहुण्या न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. याबरोबरच भारताचा २०१२- १३ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका पराभवानंतर सलग १८ मालिका जिंकण्याची मालिकाही संपुष्टात आली. दोन्ही सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली धावा करण्यासाठी संघर्ष करत होते; तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी विशेष प्रभाव पाडू शकली नाही.
कार्तिक म्हणाला की, मालिकेच्या पराभवाचा दोष वरिष्ठ खेळाडूंना का देऊ नये? आपण काय चांगले करू शकलो असतो, असे ते स्वतःलाच विचारतील. अपयशापासून ते पळ काढत आहेत असे वाटत नाही. जर तुम्ही विजय साजरे करू शकत असाल आणि चाहत्यांना तुम्ही महत्त्वाचे वाटत असाल तर तुम्ही हरल्यावर त्यांना तोंड देण्याचे धैर्य ठेवले पाहिजे, असे मला वाटते. कार्तिक म्हणाला की, वरिष्ठ खेळाडू स्वतः पराभवाची जबाबदारी घेतील आणि ही त्यांची सर्वोत्तम मालिका नव्हती हे स्वीकारतील. तसेच जर तुम्ही संघातील प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर विचारले की, मालिकेबाबत तुम्ही काय विचार करता? तर मला नाही वाटत की ते संपूर्ण संघाच्या कामगिरीबाबत काही विशेष सांगू शकतील. भारतात कसोटी क्रिकेटचे भविष्य आणि भारतीय कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम काय करता येईल, हे खेळाडूंना विचारायला हवे. संघातील प्रत्येकाला मी वैयक्तिकरीत्या ओळखतो. ते म्हणतील की, त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम मालिका नव्हती. मग प्रश्न हा उपस्थित होतो की, त्यांना सर्वोत्तम होण्यासाठी काय करण्याची गरज आहे? हाच एक प्रश्न आहे, असेही कार्तिकने सांगितले.
भारताची दोन्ही सामन्यांमध्ये रणनीती चुकल्यामुळे आणि फलंदाजी ढेपाळल्यानंतर नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावरही टीकेची झोड उठली आहे; पण संजय मांजरेकर यांनी त्याचे समर्थन केले आहे. मांजरेकर यांनी सांगितले की, प्रशिक्षकाचा संघावर सर्वांत कमी प्रभाव असतो. प्रशिक्षक मैदानावर पायही ठेवत नाही. कर्णधार तेथे प्रभावी असतो; पण तुम्हाला वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीसाठी त्याचे कौतुक करायला हवे.