इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर ( Virat Kohli vs Gautam Gambhir) यांच्यातला राडा चांगलाच चर्चिला गेला होता. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं या दोघांची १०० टक्के मॅच फी कापली होती आणि सज्जड दमही भरला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवल्यानंतर हा वाद झाला होता. सामन्यानंतर गंभीर RCBच्या फलंदाजांच्या अंगावर वाद घालण्यासाठी धावून गेल्याचे सर्वांनी पाहिले होते. त्याआधी दोन्ही संघाचे खेळाडू हात मिळवत असताना LSGचा नवीन उल हकने विराटचा हात झटकून त्याच्यासोबत शाब्दिक बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला होता.
या वादात गंभीरने एन्ट्री घेतल्याने प्रकरण अधिक तापले होते. त्यानंतर कोहली व नवीन यांच्यात इंस्टाग्रामवरही टोमणेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. गौतम गंभीरने यानंतर वादावर आपले मत मांडले. तो म्हणालेला,'' जो वाद झाला तो आम्ही मैदानावरच सोडून दिला, मैदानाबाहेर घेऊन आलो नाही. त्यात वैयक्तिक भांडण नाही.'' पण, पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शेहजाद ( Ahmed Shehzad) याला काही वेगळंच वाटतंय... गंभीरचं हे वागणं म्हणजे कोहलीच्या यशाला तो जळतो. त्यामुळेच तो मुद्दाम त्याच्यासोबत बाद करण्याची संधी शोधत असतो. LSGच्या ताफ्यातील युवा खेळाडूंच्या मनात विराटबद्दल तो नकारात्मक भावना निर्माण करतो.
"मी जे पाहिलं, ते खरंच वेदनादायक होतं. अफगाणिस्तानचा तो खेळाडू आणि कोहली यांच्यात मैदानावर काय घडलं ते मी समजू शकतो. या गोष्टी घडतात, पण गंभीर विराटला का लक्ष्य करेल हे तुम्हाला समजत नाही. तो भारताचा खेळाडू आहे आणि सध्या जगातील सर्वात मोठा खेळाडू आहे. त्याने कोहलीविरुद्ध जे हावभाव दाखवले ते योग्य नव्हते. गंभीरने काहीतरी मत्सर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटले," असे त्याने नादिर अली पॉडकास्टवर सांगितले.
"गंभीरला कोहलीसोबत समस्या याआधीही होत्या आणि हे आपण पाहिलं आहे. मला वाटतं की तो कोहलीचा हेवा करतो आणि त्याच्यासोबत वाद घालण्याची संधी शोधतो. मी कधीही कोणाला कोहलीशी गैरवर्तन करताना पाहिलं नाही. तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे. गंभीर सांगतो की, त्याने एकदा त्याचा सामनावीराचा पुरस्कार कोहलीसोबत शेअर केला होता. विराटने तुम्हाला विचारले का? किंवा त्याला देऊन तुम्हाला असे वाटते का? तुमचा पुरस्कार, तुम्हाला आयुष्यभर कोहलीशी गैरवर्तन करण्याचा अधिकार मिळाला आहे का? हे असे चालत नाही,” असेही त्याने म्हटले.
तो पुढे म्हणाला,"मला वाटते की कोहलीने मिळवलेला आदर आणि यश तो पचवू शकला नाही. त्याने एवढ्या लहान वयात जे मिळवले ते गंभीर त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत मिळवू शकला नाही. जर तुम्ही खरोखर मोठे खेळाडू आहात, तर तुम्हाला तुमची चूक लक्षात आली पाहिजे आणि त्याची माफी मागितली पाहिजे."