नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर राजकारणात प्रवेश करणार, या चर्चांना उत आला होता. पण गंभीरने मात्र गेल्यावर्षी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नव्हते. पण आता नवीन वर्षांत मात्र गंभीरने राजकारणाच्या मैदानात उतरण्याबाबत मौन सोडलं आहे. तो नेमका काय म्हणाला ते जाणून घ्या...
गंभीर आपल्या ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी बोलत असतो. त्याच्या ट्विटमधून बऱ्याचदा देशप्रेमही दिसले आहे. त्याचबरोबर देशासाठी त्याने बऱ्याच गोष्टी यापूर्वीही केल्या आहेत. त्यामुळे गंभीर क्रिकेटनंतर आता राजकारणाच्या मैदानात येणार, अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेला खुद्द गंभीरने उत्तर दिले आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीर म्हणाला की, " राजकारणात येण्यासाठी मी लायक आहे आणि देशामध्ये मी काही चांगले बदल घडूव शकतो असे देशवासियांना वाटत असेल. त्याचबरोबर देशकार्य करण्याची माझ्यामध्ये उर्जा असेल, असेही त्यांना वाटत असेल तर नक्कीच मी राजकारणात उतरू शकतो. "
गंभीर पुढे म्हणाला की, " माझी जी क्षमता आहे त्यानुसार जर देशामध्ये चांगले बदल घडवू शकतो, असे जर लोकांना वाटत असेल तर नक्कीच मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल. "
गंभीर राजकारणात कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण येत्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी त्याला उमेदवारी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. गंभीरला भाजपाकडून लोकसभेसाठी तिकिट मिळू शकते, असेही तर्क लढवले जात आहेत. जर गंभीरने निवडणूक लढवली नाही तरीही त्याला राज्यसभेत प्रवेश मिळू शकतो, अशीही चर्चा सुरु आहे.