Gautam Gambhir Amit Shah: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर सध्या खूप चर्चेत आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने IPL 2024 चे विजेतेपद पटकावले. आता टीम इंडियाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतही गंभीरचे नाव आघाडीवर आहे. वृत्तानुसार, गंभीरचा BCCIशी करार निश्चित झाला असून केवळ त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. T20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक (Team India Head Coach) राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यानंतर गंभीर हे पद स्वीकारेल असे बोलले जात आहे. या सगळ्या दरम्यान गौतम गंभीरने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
गौतम गंभीरने ट्विटरवर फोटो शेअर करताना गंभीरने लिहिले की, माननीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गृहमंत्री म्हणून त्यांचे नेतृत्व आपल्या देशाची सुरक्षा आणि स्थैर्य आणखी मजबूत करेल, असा विश्वास गंभीरने व्यक्त केले.
गौतम गंभीरने ४ डिसेंबर २०१८ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. गंभीरने भारतासाठी ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४ हजारांहून अधिक धावा केल्या. गंभीरने १४७ वन-डे सामन्यांमध्ये ५,२३८ धावा केल्या. २०११च्या विश्वचषक फायनलमध्ये गंभीरने ९७ धावांची दमदार खेळी केली होती. तसेच, IPLमध्येही चांगली कामगिरी केली.
गौतम गंभीर भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्लीतून लोकसभेचा खासदार झाला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने पूर्व दिल्ली मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गंभीरने राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्याने २०२४ची लोकसभा निवडणूक लढवली नाही.