भारतीय पुरुष क्रिकेट संघाला लवकरच नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे आणि त्यामुळे संघातील सीनियर खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली यांची चिंता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राहुल द्रविड याचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे आणि दी वॉलने या पदासाठी पुन्हा अर्ज करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. BCCI ने या पदासाठी मागवलेल्या अर्जात गौतम गंभीर व डब्लूव्ही रमण यांनीच उत्साह दाखवला आणि या दोघांच्या मुलाखती काल पार पडल्या. गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
"संघात वयस्कर खेळाडू आहेत..."; कोचपदाच्या मुलाखतीत गौतम गंभीरला विचारले गेले ३ प्रश्न
गौतम गंभीरचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनणे हे रोहित व विराट यांच्यासाठी चिंतेचं कारण बनू शकते, कदाचित या दोघांना ट्वेंटी-२० संघातून बाहेर बसवले जाऊ शकते. कारण, की गौतम गंभीरने हे पद स्वीकारण्यापूर्वी BCCI कडे काही मागण्या ठेवल्या होत्या. भारताचा स्टार फलंदाज विराट व दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्यातला वाद सर्वांना माहित्येय.. कुंबळे यांच्या प्रशिक्षणावर विराटने नाराजी व्यक्त केली होती आणि तेव्हा तो कर्णधारही होता. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली होती. पण, विराटच्या नाराजीमुळे त्यानंतर कुंबळे यांची उचलबांगडी झाली.
रोहित शर्माची ट्वेंटी-२०तील कारकीर्द संपल्यात जमा आहे, कारण तो आता ३७ वर्षांच आहे आणि युवा खेळाडूंना संधी मिळावी, याकरिता तो या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. पण, टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व त्याच्याकडे कायम ठेवले जाऊ शकते. त्यात गौतम गंभीरने रेड व व्हाईट बॉल क्रिकेटसाठी वेगवेगळ्या संघाची मागणी केल्याचे समजते आणि बीसीसीआयने ती मान्यही केली आहे. त्यामुळे रोहितचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा प्रवास संपल्यात जमा आहे. रोहितसह विराट, मोहम्मद शमी यांनाही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुढे खेळता येईल, याची शक्यता कमीच आहे.