Join us  

गौतम गंभीर... सिर्फ नाम ही काफी हैं...

आता रणजी सामन्यानंतर गंभीर निवृत्ती पत्करतो आहे. या सामन्यात तरी तो प्रकाशझोतात यावा. कारण आतापर्यंत यशाच्या गाडीतील विंडोसीट त्याला मिळालेली नाही, ती त्याला मिळायला हवी. कारण दुसरा गंभीर होणे नाही.

By प्रसाद लाड | Published: December 05, 2018 4:03 PM

Open in App
ठळक मुद्देसौरव गांगुलीनंतरचं गंभीर हे कॅप्टन मटेरियल होतं. एक परीपूर्ण सलामीवीर कसा असावा, तर गंभीरसारखा.खरे तर गंभीर बेरक्या नव्हता. धुर्त नव्हता. त्यामुळे राजकारणात त्याचा किती निभाव लागेल हे माहीत नाही.

मुंबई : काही जणांना जाहीरातबाजीची सवय नसते. स्वत:चं मार्केटींग त्यांना करत येत नाही. लाळघोटपणा जमत नाही. राजकारणातले डावपेच आखता येत नाहीत. नशिबही असं की देदिप्यमान कामगिरी केल्यावरही ती प्रकाशझोतात येत नाही. तरीही एका शापित गंधर्वासारखे ते निर्लेपपणे सेवा करत राहतात. आपल्या काय मिळेल किंवा काय मिळतंय, याची तमा न बाळगता. तोही तसाच. अरे ला कारे म्हणणारा. कुणाकडूनही चुक घडली तर कान टोचणारा. मनस्वी. जिंदादिल. बेधडक. त्यामुळेच त्याचं क्रिकेट सोडून जाणं बऱ्याच जणांच्या मनाला वेदना देऊन गेलं. हळहळ व्यक्त झाली. कारण भारताच्या दोन विश्वविजयाचा तो शिल्पकार होता. गौतम गंभीर... नावंच पुरेसं आहे ना...

साल 2007. भारताचा वेस्ट इंडिजमधल्या विश्वचषकात मानहानीकारक पराभव झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत ट्वेन्टी-20 विश्वचषक होता. बीसीसीआयने ट्वेन्टी-20 क्रिकेटसाठी नाक मुरडलं होतं. त्यामुळेच बीसीसीआयने दुय्यम संघ पाठवला होता. पण घडलं निराळंच. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. भारताची पहिली फलंदाजी होती. भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे धारातीर्थी पडत होते. पण गंभीर उभा राहिला. पण उभा राहिला नाही तर 54 चेंडूंत 75 धावांची खेळी साकारून भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. जर गंभीर खेळला नसता तर भारताचे धावांचे शतकही होऊ शकले नसते. पण या सामन्यात लक्षात राहिला तो जोगिंदर शर्मा. अखेरच्या षटकाचा तो थरार. श्रीशांतने पकडलेला झेल आणि विजयाच्या जल्लोषामध्ये गंभीरची खेळी विरुन गेली.

साल 2011. विश्वचषकाची अंतिम फेरी. मुंबईतले वानखेडे मैदान सज्ज होते. श्रीलंकेची पहिली फलंदाजी होती. श्रीलंकेने भारतापुढे 275 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करत वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे रथी-महारथी झटपट बाद झाले. अन् वानखेडेमध्ये स्मशान शांतता पसरला. सारे चिडीचुप. सचिन बाद झाल्या सामना बघायचा नाही, असं काहींनी ठरवलं होतं. लोकं सामना सोडून मालिकेकडे वळली. काहींनी आपली रखडलेली कामं करायला सुरुवात केली. पण काही वेळाने सामन्याची काय परिस्थिती आहे म्हणून टीव्ही लावला, तर चमत्कार झाल्यासारखे डोळे विस्फारले गेले. कारण भारताचा विजय आता दृष्टीपथात येत होता. सुरुवातीला हळुवार असणारी पावलं आता भक्कमपणे विजयाच्या दिशेने कूच करत होती. आणि याचा शिल्पकार होता तो गंभीर. आपल्या नजाकभऱ्या फलंदाजीने त्याने चाहत्यांना विश्वास परत मिळवला होता. भारताच्या 99 धावांमध्ये गंभीरचा 50 धावा होत्या. एकहाती तो संघाला विश्वविजयाकडे घेऊन चालला होता. गंभीर आता शतक झळकावणार आणि त्याचे नाव क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्णांक्षरांनी लिहिले जाणार, असं पक्के समजले जात होते. पण 97 धावांवर असताना तो परेराच्या गोलंदाजीवर चाल करून आला अन् त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. तो जेव्हा बोल्ड झाला तेव्हा अंगावर काटा शहारला होता. तो एक मोठा धक्काच होता. गंभीर खेळपट्टी सोडून परतीच्या वाटेवर निघाला. हेल्मेट काढले. 97 धावा काढूनही संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करू शकलो नाही, हे शल्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. चाहते तेव्हा खऱ्या अर्थाने भानावर आले. अख्खं वानखेडे तेव्हा टाळ्यांच्या आवाजाने निनादून गेलं होतं. प्रेक्षकांनी उभं राहून त्याला मानवंदना दिली. सामनावीराच्या पुरस्कारापेक्षा सच्चा क्रिकेटपटूला हेच महत्वाचं असतं. यावेळीही गंभीरची 97 धावांची खेळी धोनीच्या अखेरच्या षटकाराने झाकोळली गेली. सामनावीराचा हकदार खऱ्या अर्थाने गंभीर होता. कारण त्याने संघाला श्रीलंकेच्या तावडीतून सहीसलामत सोडवलं होतं. पण सामनावीर झाला तो धोनी.

फक्त या दोन खेळींपुरता गंभीर मर्यादीत नाही. पण त्याच्या सर्वोत्तम खेळींमधल्या या दोन खेळी नक्कीच असतील. सलग चार कसोटी मालिकांमध्ये तिनशेपेक्षा जास्त धावा गंभीरच्या नावावर होत्या. 2008 आणि 2009 या वर्षांमध्ये गंभीर भन्नाट फॉर्मात होता. भारताकडून सर्वाधिक धावा आणि शतके त्याच्याच नावावर होती. आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूही तो ठरला होता, त्याचबरोबर फलंदाजांच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान होता.

गंभीर म्हटल्यावर त्याचा काही खेळी आठवतात आणि त्याचबरोबर मैदानात त्याचा चढलेला पाराही आठवतो. आयपीएलमध्ये दिल्लीच्याच विराट कोहलीबरोबरचे भांडण तुम्हाला आठवत असेल. पण स्वत: दिडशे धावांची खेळी साकारल्यावर आपल्याला मिळालेला सामनावीराचा पुरस्कार त्याने कोहलीला दिला होता, हे किती जणांना माहिती आहे. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला त्याने भरलेला दम, शेन वॉटसनला मारलेला कोपर, सायमन कॅटीचबरोबर झालेली बाचाबाची, असे बरेच प्रकार गंभीरच्या बाबतीत घडले. पण गंभीरने कधीही स्वत:हून या गोष्टी केल्या नाहीत. त्याला डिवचल्यावर मात्र तो कधीही शांत बसला नाही.

सौरव गांगुलीनंतरचं गंभीर हे कॅप्टन मटेरियल होतं. पण राजकारण आणि नशिब यामुळे गंभीरच्या वाट्याला फक्त सहा सामने नेतृत्व करण्यासाठी आले. या सहाही सामन्यांमध्ये त्याने सर्व भारताला जिंकवून दिले. पण या विजयाच्या टक्केवारीनंतरही त्याच्याकडे एक कर्णधार म्हणून कुणी गंभीरपणे पाहिले नाही. पण आयपीएलमध्ये जेव्हा त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने दोनदा संघाला जेतेपद पटकावून दिले. आयपीएलमध्ये गेल्यावर्षी त्याला कोलकाताने संघात कायम ठेवलं नाही. त्यामुळे तो आपल्या जुन्या दिल्लीच्या संघात दाखल झाला. धावा आणि फॉर्म रुसलेला होता. नेतृत्वही चांगलं होतं नव्हतं. त्यामुळे स्पर्धा सुरु असताना त्याला नेतृत्व सोडावं लागलं. त्यानंतर तो संघाबाहेर बसला.

गंभीरच्या फलंदाजीमध्ये एक वेगळीच नजाकत होती. जी काही वर्षांपूर्वी ब्रायन लाराच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाली होती. गंभीर ज्यापद्धतीने एका पायावर बसून कव्हर ड्राइव्ह मारायचा, ते पाहणे नजरेचे पारणे फेडणारे होते. खेळपट्टीवर चालत चेंडूवर तो जसा प्रहार करायचा, ते आठवल्यावाचून राहू शकत नाही. त्याच्या फलंदाजीमध्ये कोणतीही कमतरता नव्हती. एक परीपूर्ण सलामीवीर कसा असावा, तर गंभीरसारखा.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कर्णधार धोनीने सलामीवीरांमध्ये रोटेशन पॉलिसी आणली होती. तो सेहवाग आणि गंभीर यांना एक सुचक इशारा होता. आता तुमची कारकिर्द मावळतीकडे झुकायला लागली आहे आणि रोहित शर्मासारखा सूर्य उदयाला येत आहे, हे धोनीने आपल्या या कृतीतून सांगितले होते. हीच गोष्ट या दोघांना समजली नाही. पण नशिबाने थट्टा मांडली आणि या दोघांवर धावा रुसल्या. गंभीरला संघातून बाहेर काढले, पण तरीही तो स्थानिक क्रिकेट कायम खेळत राहीला. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्याने पुन्हा एकदा संघाचे दार ठोठावले. संघात पुनरागमन केले. पण पुन्हा एकदा त्याच्याकडून दमदार कामगिरी झाली नाही. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता. पण स्थानिक क्रिकेटबरोबर आपल्या सीमेवरील जवानांना तो मदत करत होता. आता पुढे तो राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खरे तर गंभीर बेरक्या नव्हता. धुर्त नव्हता. त्यामुळे राजकारणात त्याचा किती निभाव लागेल हे माहीत नाही. त्याने राजकारणामध्ये उतरावं की नाही, हे सांगणारे आपण कोण... 

खरं तर गंभीर हे क्रिकेट विश्वातलं मानाचं पान होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामना खेळताना त्याची निवृत्ती पाहायला मिळाली असती तर बोच लागली नसती. पण आता रणजी सामन्यानंतर तो निवृत्ती पत्करतो आहे. या सामन्यात तरी तो प्रकाशझोतात यावा. कारण आतापर्यंत यशाच्या गाडीतील विंडोसीट त्याला मिळालेली नाही, ती त्याला मिळायला हवी. कारण असा गंभीर होणे नाही.

 

 

टॅग्स :गौतम गंभीर