Gautam Gambhir BCCI, IND vs NZ Test: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला पहिल्यांदाच घरच्या मैदानावर तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत 'क्लीन स्वीप'चा सामना करावा लागला. तसेच २४ वर्षांनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत व्हाईटवॉशचा सामना केला. याआधी दक्षिण आफ्रिकेने २००० साली दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली होती.
गंभीरच्या कामगिरीवर BCCI ची नजर
या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंभीरने चार महिन्यांपूर्वी मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. पण कसोटी मालिकेतील पराभवामुळे त्याच्यावर प्रचंड दडपण आले आहे. BCCI ने गंभीरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी विशेष परवानगी दिली होती. पण आता हाती आलेल्या अहवालातून असे दिसून आले आहे की गौतमसाठी काही गोष्टी 'गंभीर' दिसत आहेत.
गौतम गंभीरला अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या रवी शास्त्री आणि राहुल द्रविडला देण्यात आल्या नव्हत्या. BCCI च्या नियमानुसार, मुख्य प्रशिक्षकाला निवड समितीच्या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी नसते पण दौऱ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य प्रशिक्षकाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत.
सिराजला 'नाईट वॉचमन' पाठवणे कितपत योग्य?
गौतम गंभीरने कसोटीत मोहम्मद सिराजला नाईट वॉचमन म्हणून पाठवणे आणि पहिल्या डावात सर्फराज खानला आठव्या क्रमांकावर पाठवणे ही अशी काही धोरणात्मक पावले आहेत, ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
हर्षित राणाला संधीच नाही
गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही आहेत. पण राणाला श्रीलंका किंवा बांगलादेशविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली नाही. हर्षित राणाला भारत-अ संघासोबत ऑस्ट्रेलियाला पाठवले असते, तर तेथील उसळत्या खेळपट्ट्यांवर सामने खेळल्याची त्याला सवय झाली असती.
हार्दिकचा पर्याय शोधला, पण...
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत नितीश कुमार रेड्डी याचा गोलंदाज म्हणून १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता. पण मालिकेत तीनपैकी दोन खेळपट्ट्या रँक टर्नर होत्या. तो वेगवान गोलंदाज असल्याने नितीशला संधी मिळाली नाही. तसेच ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या सामन्यात त्याला शॉर्ट बॉलसमोर खेळताना समस्या उद्भवली. त्याचा गोलंदाजीचा फॉर्मही चांगला दिसत नव्हता. अशा वेळी हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून नितीश रेड्डीला आणण्यात असले तरीही त्याची उपयुक्तता किती याबाबतही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकते.